आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मविआच्या नाकाखालून सरकार आणले:देवेंद्र फडणवीसांचे वक्तव्य; आम्ही त्या दोघांत नाक खुपसायला जात नाही - अजित पवारांचे प्रत्युत्तर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'मविआ'च्या नाकाखालून आम्ही त्यांचे सरकार घेऊन गेलो आणि आम्ही सरकार तयार केले. आमचे सरकार टीकणार आणि पुन्हा येणार असे टीकात्मक वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. यावर आम्ही त्या (शिंदे - फडणवीस) दोघांत नाक खुपसायला जात नाही असे म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तोफ डागत प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीसांनी मविआवर टीका केली व एकनाथ शिंदे यांची पाठराखणही केली. ते म्हणाले, ज्यांना स्वःतचे सरकार टिकवता आले नाही. त्यांच्या नाकाखालून आम्ही त्यांचे सरकार घेऊन गेलो आणि आम्ही सरकार तयार केले. कशाच्या वल्गना करताय? पुन्हा हे सरकार पुन्हा येणार, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार, त्यांच्याच नेतृत्वात हे सरकार पुन्हा निवडणुका लढणार आणि त्यांच्याच नेतृत्वात आमचे सरकार येणार.

अजित पवारांचीही सडकून टीका

अजित पवार म्हणाले, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही त्या दोघांमध्ये नाक खूपसत नाही. त्यांनी नाकाखालून सरकार काढले तर आम्ही तेथे नाक खूपसायला जात नाही, असा प्रतिहल्ला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.

मविआचा ट्रॅक सुटला - फडणवीस

देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे व्हिडिओ बाहेर येत आहेत ते अक्षरशः लाजीरवाणे आहेत. मोर्चात सहभागी होणाऱ्यांना पैसे वाटले गेले हे व्हिडिओत दिसत आहे. कुणाचा मोर्चा आणि काय मागण्या, काय कार्यक्रम आहे हेही पैसे घेणाऱ्यांना माहित नाही. एवढे सर्व मविआने करुन त्यांना गर्दी जमवता आली नाही. याचा अर्थ कुठे तरी जनतेला काय हवे, जनतेच्या मनात काय आहे याचा ट्रॅक मविआचा सुटलेला आहे. जनतेलाही माहीत आहे की, ते राजकारणासाठी राजकारण करीत आहेत.

पैसे वाटणारांची चौकशी करा - अजित पवार

अजित पवार म्हणाले, आमच्या मोर्चात पैसे वाटले गेले हे धादांत खोटे आहे. ज्यांचे फोटो आहेत त्यांना विचारावे की, कुणी कुणाला पैसे दिले. पैसे कुणी वाटले याची चौकशी करायला हवी. कुणी तेथे त्यांना बोलावले. ज्याने आरोप केला हाच यामागचा बोलविता धनी आहे.

बातम्या आणखी आहेत...