आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेद्र फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल:'आंधळ दळतंय आणि कुत्र पिठ खातंय' अशी अवस्था, मविआ म्हणजे  'महा विनाश आघाडी' आणि 'मद्य विक्री आघाडी',

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मविआ म्हणजे 'महा विनाश आघाडी' आणि 'मद्य विक्री आघाडी', सरकार असल्याचा उल्लेख केला.

मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. यावेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील निशाणा साधला. आज छोटं का होईना मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकायला मिळालं, असे ते म्हणाले. सरकारला जनतेशी देणं घेणं नसून त्यांच्याकडे एकही नवी योजना नसल्याची टीका फडणवीस यांनी सरकारवर केली.

विंदा करंदीकरांच्या कवितेचा आधार घेत फडणवीसांचा सरकारवर निशाणा
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
माकडछाप दंतमंजन, तोच चहा, तेच रंजन
तीच गाडी, तेच तराणे, तेच मूर्ख, तेच शहाणे
सकाळपासून रात्रीपर्यंत तेच ते तेच ते
खानावळीही बदलून पाहिल्या,
कारण जीभ बदलणं शक्य नव्हतं
काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल
नरम मसाला, गरम मसाला तोच तो भाजीपाला
तीच ती खवट चटणी, तेच ते आंबट सार
सुख थोडे आणि दुःख फार

मुंबईला लुटलं -

मुंबई महापालिका ही देशात सर्वात श्रीमंत महापालिका आहे. पण फायनान्शियल रँकमध्ये मुंबईचा 45 वा क्रमांक लागतो. नागपूर, नवी मुंबई महापालिकाही याबाबत मुंबईच्या पुढे आहेत. मुंबई महापालिकेत सत्ताधारी म्हणून काम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. पालिकेतली सत्ता हवी म्हणून फक्त मुंबईकडे पाहिलं गेलं आहे. मुंबई मेली तरी चालेल पण आपली घरं भरली पाहीजेत, अशी काही लोकांची भूमिका आहे. मुंबई महापालिकेला लुटलं आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे. सफाई कामगाराच्या नावावर आपल्या तिजोऱ्या कशा भरल्या हे अमित साटम तुम्हाला व्यवस्थित सांगतील. जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा, एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. यूएनने कौतुक केलं, कोर्टानं कौतुक केलं, पण हा भ्रष्टाचार, हे घोटाळे त्यांच्यासमोर जायला हवेत, असे फडणवीस यांनी म्हटलं.

सत्ताधाऱ्यांनी कोरोनाकाळात मृताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं -
कोरोनाकाळात झालेल्या घोटाळ्यांवर फडणवीस यांनी यादीच वाचली. सत्ताधाऱ्यांनी कोरोनाकाळात मृताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं आहे. कोरोनाकाळात मुंबईतलं एकही सेंटर भ्रष्टाचारातून सुटलं नाही. हे घोटाळे कोर्टापुढे गेले पाहिजेत. हे सर्व न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणार, असे फडणवीस यांनी विधानसभेत म्हटलं. याशिवाय, ऑक्सिजन प्लांट उभारणीतही घोटाळा झाला, ब्लॅकलिस्टेड कंपन्यांना कंत्राटं दिली, मुलुंड कोवीड सेंटरमध्येही घोटळा झाला आणि कॅन्सर ट्रस्ट संस्थेच्या नावाखालीदेखील भ्रष्टाचार केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. मुंबई महापालिकेने अनेक घोटाळे केले. सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक कोविड सेंटर चालवत होते, असे फडणवीस यांनी म्हटलं.

अंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं अशी अवस्था -
महापालिकेत अनेक फाईली अजूनही प्रलंबित असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी फडणवीसांनी रेंगाळलेल्या कामांची यादी वाचली. महापालिकेला पेंग्विनमध्ये रस आहे. मलबार हिल एरियात रोज काहितरी नवीन दिसतं. ही एक चांगली गोष्ट आहे. पण, दुसरीकडे रुग्णालयात साहित्यही मिळालं पाहिजे. मुंबईत अंधळं दळतं आणि कुत्र पिठ खातं अशी अवस्था असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं.

रघुनाथ कुचेंना बलात्काराचा आरोप होऊन अटक नाही -
शिवसेना पदाधिकारी रघुनाथ कुचेंना बलात्काराचा आरोप होऊन अटक झाली नाही. रघुनाथ कुचेंनी महिलेला लग्नाचे अमिष देऊन अत्याचार केल्याचे फडणवीसांनी म्हटलं. सत्ता पक्षातील व्यक्तीने काहीही केलं तर चालतं का, असा सवाल त्यांनी यावेळी केला. गुन्हा दाखल झाल्यावर अटक होण्याचा नियम आहे. मात्र अजूनही कोणतीच कारवाई नाही, असे फडणवीस म्हणाले.

नवाब मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही -
नवाब मलिक यांच्याबाबतीत एवढा हट्ट का सरकारकडून करण्यात येत आहे. त्याचा राजीनामा का घेतला जात नाही. सरकारच्या प्रतिमेवर त्याचा परिणाम होत आहे.मलिकांचा राजीनामा घेत परंपरा पाळली पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.

सोलापुरातही एक 'सचिन वाझे' -
सोलापुरातही एक 'सचिन वाझे' आहे, जो महिन्याला लाखोंची वसुली करतोय, असे फडणवीस यांनी म्हटलं. त्याच्याकडून महिन्याकाठी 60 लाखांची वसुली केली जाते. हे पैसे वरतीपर्यंत द्यावे लागतात, असे तो म्हणतो. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे सोलापुरातील अवैध धंद्यांवर बोलले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना किंवा त्यांच्या मुलाला फसवण्याची धमकी दिली जाते, असे फडणवीस यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...