आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑपरेशन लोटस?:दिल्लीमध्ये मोदी-शहा यांची भेट घेत फडणवीस यांची ‘साखरपेरणी’; दोघांत 50 मिनिटे बंद दाराआड चर्चा

मुंबई / नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाडापाडी नव्हे, साखर उद्योगांच्या समस्यांसाठी भेटल्याचा फडणवीसांचा दावा

माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत शुक्रवारी अाधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी यांची भेट घेतली. फडणवीस आणि शहा या दोघांत ५० मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. या वेळी त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातील साखरपट्ट्यातील विनय कोरे, हर्षवर्धन पाटील, रणजित निंबाळकर, धनंजय महाडिक, पृथ्वीराज देशमुख, जीवन गोरे हे नेतेही होते. यानंतर फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली.

या भेटीमुळे राज्यात पुन्हा ‘आॅपरेशन लोटस’ची चर्चा रंगली. तथापि, महाराष्ट्रातील ठाकरे सरकार पाडण्यात भाजपला रस नसून साखर उद्योगांच्या समस्या आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीत आम्ही आलो आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र, फडणवीस यांचा हा दौरा महाराष्ट्रात पुन्हा ‘आॅपरेशन लोटस’ राबवण्याची चाचपणी असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.

ठाकरे सरकार पडेल तेव्हा बघू काय करायचे

दिल्लीतील पत्रकार परिषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, यंदा महाराष्ट्रात उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांना एफआरपी आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो आहोत. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न नाहीत. हे अंतर्विरोधाचे सरकार चालेल तोपर्यंत चालेल; पडेल तेव्हा बघू काय करायचे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर दिली.

केंद्रात वर्णी लागल्याच्या चर्चा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची आता केंद्रात वर्णी लागणार असल्याच्या चर्चा आहेत. यावर फडणवीस म्हणाले की, ‘भाजपची नवी कार्यकारिणी तयार झालेली नाही. ती झाल्यानंतर पक्षाच्या संंसदीय मंडळावर कुणाला घ्यायचे हे पक्षाचे अध्यक्ष व नेते ठरवतील.

साखर उद्योगांना पॅकेज देण्याची केली मागणी

शुक्रवारी दुपारी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेतली. साखर उद्योगांना पॅकेज, योग्य एफआरपीसाठी एमएसपीत वाढ, इथेनाॅल धोरणाचा विस्तार करावा तसेच कारखान्यांच्या कर्ज पुनर्गठनाच्या मागण्या त्यांनी केल्या.

भाजपमध्ये आलेले शुगर बेल्टमधील नेते अस्वस्थ

साखर उद्योग अडचणीत आल्याने भाजपत आलेले साखर कारखानदार अस्वस्थ आहेत. त्यांना केंद्राने मदत नाही केल्यास पक्षासमोर राज्यात अडचणी उभ्या राहतील, अशी भीती भाजपला वाटते. भाजपत साखर कारखानदारांचे नेतृत्व नितीन गडकरी करत आले आहेत. गडकरींना टाळून या उद्योगाचे प्रश्न धसास लावण्यासाठी फडणवीस समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राजस्थान, छत्तीसगडनंतर महाराष्ट्र?

राजस्थान, छत्तीसगड आणि त्यानंतर महाराष्ट्र असा विरोधकांची सरकार पाडण्याचा भाजपचा क्रम ठरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा दिल्ली दौरा महाराष्ट्रातील ‘आॅपरेशन कमळ’च्या चाचपणीसाठी आहे, असे काँग्रेस नेते मानत आहेत.

उद्धव यांनी घेतली सेना खासदारांची बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची शुक्रवारी बैठक घेतली. फडणवीस यांच्या दिल्लीत दौऱ्यामुळे सुरू झालेल्या चर्चेबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात राजकीय प्रादुर्भाव होणार नाही. कारण आम्ही फवारणीचे पंप घेऊन फिरतोय. राज्यात सर्व आलबेल आहे. राज्यातील महाआघाडीच्या सरकारला काहीही धोका नाही.’

बातम्या आणखी आहेत...