आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीमुळे शेतकऱ्यांची राखरांगोळी:विरोधकांनी सरकारला घेरले, फडणवीसांचे आश्वासन- तत्काळ नुकसान भरपाई देणार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात अवकाळी पावसामुळे ऐन होळीत शेतकऱ्यांच्या पिकांची राखरांगोळी झाली आहे. राज्य सरकार या शेतकऱ्यांना काय मदत करणार?, असा सवाल आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ आणि नाना पटोले यांनी केला.

त्यावर राज्यात आतापर्यंत 13, 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती देत नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करणार, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

विरोधकांचा आक्रमक पवित्रा

अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभा सुरू होताच प्रथम सभागृहात अजित पवार म्हणाले की, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे रब्बी पिके भुईसपाट झाली आहे. गहू, कांदा, टोमॅटो, द्राक्ष, संत्रे, आंब्याचा मोहोर, ज्वारी या पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. ही पिके काढणीला आली होती. बाजारात त्यांची विक्री करण्याआधीच अवकाळीने बळीराजाला गाठले.

शेतकरी स्वत: मारून घेतोय

अजित पवार म्हणाले, अवकाळीमुळे झालेले नुकसान पाहून शेतकरी स्वत:च्या तोंडात मारुन घेतोय. शेतकरी आत्मक्लेश करुन घेत आहे. अशा शेतकऱ्यांना राज्य सरकार तातडीची काय मदत करणार आहे? केंद्राचे पथक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी राज्यात येणार आहे का?, असे सवाल अजित पवारांनी केले. तसेच, अधिवेशनात इतर सर्व मुद्दे बाजुला करुन केवळ शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी अजित पवारांनी केली.

ऐन होळीत शेतकऱ्यांच्या पिकांची होळी

मंगळवारी सरकार रंगाची होळी खेळत होते त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची होळी होत होती, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्लाबोल करत नाराजी व्यक्त केली. छगन भुजबळ म्हणाले, अवकाळी पावसामुळे ऐन होळी सणात शेतकऱ्याच्या जीवनाची होळी झाली आहे. शेतकरी एवढे हवाल दिल झाले आहेत की, नाशिकमध्ये तर शेतकऱ्यांनी गावच विकायला काढला आहे. अवकाळीमुळे द्राक्षबागा पूर्णपणे उखडून गेल्या आहेत. सरकार यावर ताबडतोब काय पाऊले उचलणार आहे हे सांगितले पाहिजे. शेतकरी कर्ज कसे फेडणार आहेत?, असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.

शेतकऱ्यांच्या घरात कांदा सडतोय

काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, अवकाळी शेतकऱ्यांची राखरांगोळी होण्याची भीती आहे. त्यामुळे आजचे सर्व कामकाज बंद करून केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. नागपुरात सरकारने अजूनही नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे घरात साठवून ठेवलेला शेतकऱ्यांचा कांदा सडून जात आहे. कांद्याला अळी, किडी लागत आहेत. तसेच, वीजबिल थकबाकीपोटी शेतकऱ्यांची वीज कापणार नाही, असे सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे. तरीही नागपुरात गेल्या काहि दिवसांत 57 शेतकऱ्यांच्या कृषिपंपाची विजतोडणी केली गेली.

संध्याकाळपर्यंत म्हणणे मांडणार- फडणवीस

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी अजित पवार, छगन भुजबळ, नाना पटोले यांनी सरकारला घेरल्याचे चित्र सभागृहात पाहायला मिळाले. त्यानंतर झालेल्या नुकसानीची आकडेवारी आणि अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आणि याबाबत संध्याकाळपर्यंत सरकारचे म्हणणे मांडेल असे स्पष्ट केले.

तत्काळ मदतीचे प्रस्ताव मागवले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यात आतापर्यंत 8 जिल्ह्यांत 13 हजार 729 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती सरकारला मिळाली आहे. पालघर, नाशिक, बुलढाणा, वाशिम, नंदूरबार येथील हजारो हेक्टरवरील कांदा, द्राक्ष, केळी बागा, गहू, ज्वाही, हरभरार या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. तत्काळ मदतीचे प्रस्तावही मागवले आहेत.

तसेच, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी राजकारण करू नये. मविआ सरकारने चक्रीवादळाचे पैसे अजूनही दिलेले नाहीत. मात्र, आम्ही तत्काळ मदत करणार, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

संबंधित वृत्त

अधिवेशनाचा दुसरा आठवडा:विधानसभेत विरोधकांचा स्थगन प्रस्ताव; केवळ शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...