आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीचा आजचा मोर्चा असफल झाला आहे. तीन पक्ष एकत्र येऊनदेखील आजची संख्या पाहता हा मोर्चा ड्रोनश़ॉटलायकदेखील नव्हता, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. महाविकास आघाडीच्या मोर्चानंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना मोर्चावर जोरदार टीका केली.
पक्ष मिनी होत चालला, तसा मोर्चादेखील मिनी होता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा महाविकास आघाडीचा मोर्चा हा असफल मोर्चा आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी लोक आलेच नाही. विशेष म्हणजे तीन पक्ष मिळून हा विराट मोर्चा असल्याचे सांगितले जाते. परंतू तसे मुळात अजिबात नाही. हा मोर्चा अतिशय मिनी होता.
ठाकरेंनी नवीन स्क्रिप्ट रायटर ठेवावा
आजच्या मोर्चातरी उद्धव ठाकरे नवीन काहीतरी बोलतील अशी आशा होती. पण तसे अजिबात झालेच नाही. नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे हे ठरलेले वाक्य बोलले आहेत. उद्धव ठाकरे हे किती दिवस तेच तेच डायलॉग बोलणार आहेत. शिवराळ भाषा वापरायची म्हणजे झाले बोलणे, अशी गत ठाकरेंची झालेली आहे. त्यांनी नवीन गोष्टी पाहाव्या, नवीन स्क्रिफ्ट ठेवावा, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
आझाद मैदानाऐवजी त्यांनी छोटा रस्ता निवडला
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही आझाद मैदानावर मोर्चा घ्यावा, असे आवाहन केले होते. एव्हाना आम्ही त्यासाठी परवानगी देऊ इच्छित होतो. परंतु त्यांना माहित होते की, एवढी लोकांची संख्या आपल्याकडून आणणे शक्य होणार नाही. त्यामुळे त्यांनी गल्लीबोळातून हा मोर्चा काढण्याची परवानगी घेतली. एक प्रकारे हा मोर्चा असफल झाला आहे, ड्रोनशूटिंगलायक देखील हा मोर्चा नव्हता, अशी खोचक टीका फडणवीसांनी केली आहे.
मोर्चा कोण काढू लागले, याचे नवल आहे ?
जे संतांना शिव्या देतात, ज्यांना बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला माहित नाही, ते मोर्चा काढतात; अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा मोर्चा हा राजकीय मोर्चा आहे. जे संतांना शिव्या देतात, ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहित नाही, ते आज मोर्चा काढतात. रोज सावरकरांचा अपमान काँग्रेसने केला, तेव्हा शिवसेना कुठे होती. राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका फडणवीसांनी केली.
राहुल गांधींवरही फडणवीसांचा हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बिलावर भुट्टो आणि राहुल गांधी एकत्र कसे बोलतात? बिलावर भुट्टो एका फेल राष्ट्राचे मंत्री आहे. ते आतंकवादी देशाचे मंत्री आहेत. पण भारताच्या पंतप्रधानांबद्दल भुट्टो बोलतो तेव्हा देशासाठी भुट्टोची निंदा करायला हवी होतं पण त्यांनी केली नाही. भारताचा भूभाग जेव्हा चीनमध्ये गेला, तेव्हा राहुल गांधी यांच्या घरातील व्यक्ती नेतृत्व करत होती. त्यामुळे राहुल गांधी यांना बोलण्याचा अधिकार नाही. मोदींच्या काळात तर चीनला रोखण्याचे काम केले आहे. एक इंच भारताची भूमी मोदींच्या काळात गेली नाही, असंही फडणवीस म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.