आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला:काही लोक 365 दिवस शिमगा करतात, सभ्य माणसाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही लोक 365 दिवस शिमगा करतात. होळीचा एक दिवस त्यांना ती मुभा दिली पाहीजे. मात्र, हा एक दिवस सोडून उर्वरित 364 दिवस त्यांनी सभ्य माणसाप्रमाणे वागले पाहीजे, असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.

वाईट गोष्टीचे दहन करा

आज मुंबईतील वांद्रे येथे धुलिवंदनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातील नागरिकांनी धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील सर्व नागरिकांना होळीच्या, धुलिवंदनाच्या शुभेच्छा. होळी हे एक असे पर्व आहे ज्यामध्ये होलिका दहनात आपण सर्व वाईट गोष्टीचे दहन करतो आणि नवीन सुरुवात करतो. त्याचप्रमाणे जीवनातील सर्व वाईट गोष्टी मागे टाकून आपण नव्याने सुरुवात केली पाहीजे.

बजेट सप्तरंगी असेल

देवेंद्र फडणवीस राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनात मांडणार आहे. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले, होळीप्रमाणेच अर्थसंकल्पात वेगवेगळे रंग पाहायला मिळतील. हे बजेट सप्तरंगी असेल. सर्व घटकांचा बजेटमध्ये विचार केलेला आहे. राज्याला सर्वसमावेशक अर्थसंकल्प पाहायला मिळेल.

विरोधकांना माफ केले

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी यापूर्वी बोललो होतो की, आम्हाला विरोधकांनी खूप त्रास दिला. त्याचा बदला आम्ही नक्की घेणार. मात्र, आता होळीनिमित्त मी सांगू इच्छितो की, आम्ही सर्व विरोधकांना माफ केले आहे. होळीनिमित्त मनात कुठलीही कटुता असू नये. तसेच, होळीनिमित्त अनेकजण दिवसभर भांग पिऊन मजा करतात. मात्र, असा नशा करण्यापेक्षा संगीत, अभ्यास अशा चांगल्या गोष्टींचा नशा करावा. कामाचा नशा करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केले.

शेतकऱ्यांना पूर्ण मदत करणार

अवकाळी पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, मका हे रब्बी पिके आडवी झाली आहेत. अधिवेशनात यावर आवाज उठवणार, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात होत असलेल्या अवकाळी पावसावर आमचे पूर्ण लक्ष आहे. या अवकाळीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना सरकार पूर्ण मदत करेल. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे.

संबंधित वृत्त

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंकडून धुळवड साजरी:कुटुंबियांसह साजरी केले धुलिवंदन; विविध भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी

ठाण्यात मुख्यमंत्री शिंदेंकडून कुटुंबियांसह धुळवड साजरी करण्यात आली आहे. कोरोना नंतर दोन वर्षांनी आज मोठ्या प्रमाणात धुळवड साजरी करताना दिसून येत आहे. आपले सरकार आल्यापासून गोविंदा असो की दिवाळी की होळी सर्व जण मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...