आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सत्यजित तांबेंचे अभिनंदन:म्हणाले - अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजय मिळवणे सोपे नाही

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी सत्यजीत तांबे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सत्यजीत तांबे यांनी तीन पक्ष एकत्र येऊनही त्यांच्याविरोधात विजय मिळवला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवणे सोप्पे नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्यजित तांबे यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

काँग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. दुसरीकडे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र दुप्पट मते मिळवत सत्यजीत ताबे यांनी शुभांगी पाटील यांचा दारुण पराभव केला. सत्यजीत तांबे यांच्या या दणदणीत विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

ती जागा जिंकलो नाही याचे दुःख

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, आम्ही कोकणमधील जागा बऱ्याच कालावधी नंतर जिंकलो आहोत. नागपूरमध्ये शिक्षक परिषदेने आग्रह केला आणि निवडणूक लढवली. आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. नागपूरची जागा शिक्षक परिषदेला हवी असल्याने ती आम्हाला लढवता आली नाही, ती जागा जिंकलो नाही याचे दुःख आहे. असेही त्यांनी सांगितले.

मराठवाड्यातही चुरस

अमरावतीमध्ये अपेक्षित मते मिळाली नसल्याची कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले, अमरावतीमध्ये मतांचा कोटा कोणत्याच उमेदवाराने पूर्ण केला नाही. मात्र, आम्हाला अपेक्षित मते मिळाली नाही. याचा विचार पक्ष करेल. मराठवाड्यातही चुरस होती. असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सत्यजीत तांबे भाजपात जाणार?

सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपच्या गोटात कमालीची शांतता होती. भाजपकडून नाशिकच्या जागेसाठी उमेदवारही जाहीर करण्यात आला नाही. तसेच आता देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कौतुकानंतर आता सत्यजीत तांबे भाजपात जाणार कि काँग्रेसमध्ये घरवापसी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...