आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृता फडणवीसांना Y+ सुरक्षा:रस्ता मोकळा करून देणारे वाहनही मिळणार, सुविधेबाबत देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढवत त्यांना आता Y+ दर्जाची सुरक्षा राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. तसेच, त्यांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनेही पुरवण्यात येणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

अमृता फडणवीस प्रवास करतील तेव्हा संबंधित परिसरातील रस्ता मोकळा राहिल, याची खबरदारी ही वाहने घेणार आहेत. मात्र, या सुविधेवरून आता सरकारवर टीका करण्यात येत आहे.

एकीकडे राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा कमी केली असताना अमृता यांच्या सुरक्षेत वाढ करुन वर त्यांना ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनेही पुरवण्याच्या निर्णयावर विरोधकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खुलासा केला आहे.

अमृता यांनी अर्ज केला नव्हता

देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, सुरक्षा व्यवस्था वाढवण्याबाबत अमृता फडणवीस यांनी कोणताही अर्ज केलेला नव्हता. त्यांना असलेला संभाव्य धोका लक्षात घेता उच्चस्तरीय समितीने सुरक्षा दर्जात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ता मोकळा करून देणाऱ्या वाहनासाठीदेखील अमृता फडणवीस यांनी अर्ज केला नसल्याचे देवेंद्र यांनी सांगितले.

ठाकरेंनाही दिली होती सुरक्षा

केवळ घटनात्मक पदावर असणाऱ्या व्यक्तींनाच रस्ता मोकळा करून देणाऱ्या वाहनांचा वापर करता येतो, या दाव्यावर फडणवीस म्हणाले, ठाकरे कुटुंब आणि अनेक बड्या लोकांना आतापर्यंत ट्रॅफिक क्लिअरन्स वाहनांची सुविधा पुरवण्यात आली आहे. यासाठी कोणतेही पद असणे गरजेचे नसते. तर संबंधित व्यक्तीला असणारा धोका लक्षात घेऊन यासंदर्भात निर्णय घेतला जातो. त्यामुळे आमदार नसणाऱ्या व्यक्तीलाही झेड किंवा झेड प्लस दर्जाची सुरक्षा मिळते.

नेमकी काय आहे सुविधा?

रस्ता मोकळा करून देणाऱ्या वाहनामध्ये शस्त्रधारी पोलिस नसतात. हे वाहन सुरक्षा पुरवण्यासाठी नसते. या वाहनात दोन पोलीस कर्मचारी असतात. हे वाहन अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या गाडीपासून थोड्या अंतरावर असते आणि ते सातत्याने वाहतूक नियंत्रण कक्षाच्या संपर्कात असते. या वाहनातील पोलिस वाहतूक नियंत्रण करणाऱ्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात असतात. अतिमहत्त्वाची व्यक्ती कुठपर्यंत पोहोचली आहे हे जाणून घेतल्यानंतर त्या मार्गावरील वाहतूक नियंत्रित करुन या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीसाठी रस्ता मोकळा करून देतात.

बातम्या आणखी आहेत...