आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खडसे-फडणवीस वाद:माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने खडसेंवर गुन्हा दाखल झाला, फडणवीसांचा खडसेंवर पलटवार

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनीष भंगाळे नाही तर एमआयडीसी जमीन प्रकरण खडसेंना भोवले - फडणवीस

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेत आरोप केले. देवेंद्र फडणवीसांनी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले, त्यांच्यामुळे मला त्रास झाला असे खडसे म्हणाले. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने खडसेंवर गुन्हा दाखल झाला, असे म्हणत फडणवीस यांनी पुन्हा एकदा खडकेंना बॅकफूटवर ढकलले.

एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर एमआयडीसी जमीन खरेदीप्रकरणात राजीनामा द्यावा लागला. माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशाने खडसेंवर गुन्हा दाखल झाला असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना रनोट अशा विविध विषयावर भाष्य केले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, एकनाथ खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही. मनीष भंगाळेबाबत ते बोलत आहेत, पण त्या प्रकरणात त्यांना राजीनामा द्यावा लागला नाही, त्यांना MIDC प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. मनीष भंगाळे प्रकरणात खडसेंना क्लिन चीट आहे. त्या प्रकरणात त्यांना कुठेही राजीनाम द्यावा लागला नाही. कुटुंबीयांसाठी जमीन घेतल्याचा आरोप झाला, जमीन घेत असताना खडसे पदावर होते, त्यावर आम्ही चौकशी समिती नियुक्त केली. त्यानंतर हायकोर्टाच्या आदेशाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. तो गुन्हा मी दाखल केला नाही. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं कारण नाही, आमच्या ज्येष्ठ नेत्यांच्या तक्रारी घरातल्या घरात मिटवू.

फडणवीसांच्या दाव्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर, एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस म्हणतात त्यापेक्षा मी जास्त संयमी आहे. मी पाच वर्ष झाली सहन केले. एमआयडीसी प्रकरणात कुठल्या कारणासाठी राजीनामा घेतला? एमआयडीसीची तथाकथित जी जमीन घेतली, ती एका मुस्लीम व्यक्तीची होती. 2010 पर्यंत त्या व्यक्तीचे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर होते. 2010 नंतर इतर हक्कात एमआयडीसीचे नाव लावण्यात आले. त्यानंतर कागदपत्रे पाहूनच माझी बायको आणि जावयाने ती जमीन खरेदी केली आहे. मी खरेदी केली नाही. जर मी ती जमीन खरेदी केली असेन तर मी त्यात दोषी आहे. पण बायकोने किंवा जावयाने व्यवहार केले असतील, तर त्यात मी दोषी कसा? असा सवाल खडसेंनी केला.

एकनाथ खडसे काय म्हणाले होते?

माझे 40 वर्षांचे राजकीय जीवन संपवण्याचा घाट घातला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनच मला त्रास झाला हे आज जाहीरपणे नाव घेऊन सांगतो आहे, असा थेट हल्लाबोल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी केला. मी पुरावे जमा केले आहेत, मी वरिष्ठांना जाब विचारणार, असेही खडसे यांनी सांगितले. लेखक सुनिल नेवे यांनी लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू’ या एकनाथ खडसे यांच्या चरित्राचे प्रकाशन मुक्ताईनगरमध्ये झाले. त्यावेळी खडसे बोलत होते.