आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसे-फडणवीस वाद:मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही! एकनाथ खडसेंनी केलेल्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खडसेंचा पुन्हा हल्लाबाेल

‘माझ्यात फार संयम आहे. नाथाभाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मात्र, घरची धुणी मी रस्त्यावर कधीच धूत नाही,’ असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना लगावला आहे. फडणवीस शुक्रवारी दिल्लीत प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत हाेते.

फडणवीस यांनी आज खडसे यांचे सर्व आरोप फेटाळून लावले. ते म्हणाले, ज्या मनीष भंगाळेचा खडसे सातत्याने उल्लेख करत आहेत, त्यात तथ्य नाही. भंगाळे प्रकरणात खडसेंना राजीनामा द्यावा लागलेला नाही. उलट भंगाळेने आरोप लावल्यानंतर एटीएसची समिती बनवून मी १२ तासांत अहवाल घेतला आणि १२ तासांत खडसेंना क्लीन चिट मिळाली. तसेच भंगाळेला जेलमध्ये टाकले गेले. त्यानंतर कित्येक दिवस तो जेलमध्ये होता, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले, भंगाळेच्या प्रकरणात क्लीन चिट मिळूनही खडसे ‘ड्राय क्लीनिंगची क्लीन चिट’ म्हणत असतील तर काय बोलायचे. खडसे यांच्या कुटुंबाने एमआयडीसीची जमीन घेतली आणि त्यांनी स्वत: त्याबाबतची बैठक घेतली होती. त्यांच्यावरील आरोपांमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.

त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची समिती तयार केली. या समितीचा अहवाल आमच्याकडे आला. पण त्याआधीच काही जण उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने खडसे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करा, असा निर्णय दिला. त्यामुळे तो गुन्हा मी दाखल केला किंवा तो आकसापोटी दाखल करण्यात आला असे म्हणता येणार नाही, असे फडणवीस यांनी नमूद केले.

उच्च न्यायालयाने खडसेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्यानंतरही संबंधित प्रकरणात दोनच महिन्यात आम्ही उच्च न्यायालयात अहवाल दाखल केला. पण तो कोर्टाने स्वीकारला नाही. त्यावर प्रतिपक्षाकडून हस्तक्षेप केला गेला. अनेक मुद्दे मांडले गेले आहेत. त्यामुळे तो अहवाल मान्य झाला नाही, असे नमूद करत माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्याचे कारण नाही, असे फडणवीस म्हणाले. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या काही तक्रारी नक्कीच असू शकतात. आम्ही घरातल्या घरात बसून, त्यांच्याशी चर्चा करून त्या तक्रारींचे लवकरात लवकर निरसन करू, असेही फडणवीस यांनी सांगितले. खडसेंबाबतची सगळी वस्तुस्थिती पक्षश्रेष्ठींना माहीत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तर देताना सांगितले.

खडसेंचा पुन्हा हल्लाबाेल
हॅकर मनीष भंगाळे याने माझे दाऊदशी संबध असल्याचे आराेप केल्यानंतर भंगाळे आणि कृपाशंकरसिंह हे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रात्री भेटले हाेते. त्यानंतरच मला राजीनामा मागण्यात आला. चाैकशीनंतर त्यात माझा संबंध नसल्याचे सिद्ध झाले तरी फडणवीस यांनी क्लीन चिट दिली नाही.

फडणवीस म्हणाले
- मराठा आरक्षणात आघाडी सरकारने नीट लक्ष दिले नाही. परिणामी, हायकोर्टात वैध ठरलेल्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टात स्थगिती आली.
- मराठा आरक्षणप्रश्नी रणनीतीची मोठी चूक झालेली आहे.
- कोरोनाशी लढाई सोडून आघाडी सरकार अभिनेत्री कंगनाशी लढाई करते आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser