आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांनी अब्दुल सत्तारांना झापले:कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, योजनेची माहिती फोडल्याबद्दल विचारला जाब

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच सुनावल्याचे समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राज्य सरकारच्या काही महत्त्वाच्या निर्णयांबाबत परस्पर जाहीर वक्तव्य केल्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस संतापले.

तसेच, यापुढे कोणताही निर्णय परस्पर जाहीर करू नका, अशी सक्त ताकीद फडणवीसांनी अब्दुल सत्तार यांच्यासह उतावीळ मंत्र्यांना दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मंत्र्यांना समज दिल्याची माहिती आहे.

नेमके झाले काय?

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्यातही नवीन सन्मान योजना राबवण्याबाबत राज्य सरकार विचार करत आहे. याबाबत शिंदे- फडणवीस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच ही माहिती प्रसारमाध्यमांमध्ये फुटली. त्यामुळे सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची गंभीर दखल घेतली. मंत्रिमंडळ बैठकीतच फडणवीसांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना धारेवर धरत ही माहिती फोडल्याबद्दल जाब विचारला.

तुम्ही माहिती जाहीर कशी केली?

फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांना थेट विचारणाच केली की, शेतकरी सन्मान योजनेबाबत कोणताही निर्णय झालेला नसताना तुम्ही ही माहिती जाहीर कशी केली? त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सत्तार यांना खडसावले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. सत्तार यांनी सांगितले, आपण निर्णय झाल्याचे माध्यमांना म्हणालो नाही, तर विचार सुरू असल्याचेच सांगितले. त्यावर उपमुख्यमंत्र्यांचे समाधान झाले नाही व त्यांनी परस्पर लोकप्रिय घोषणा करणाऱ्या सर्वच मंत्र्यांना सक्त ताकीद दिली.

फडणवीसांची सक्त ताकीद

फडणवीस यांनी मंत्र्यांना ताकीद दिली की, केवळ विचार सुरू असताना घोषणा केल्यास त्या निर्णयाचे महत्त्व निघून जाते. कोणताही निर्णय जाहीर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडेच आहेत. एखाद्या निर्णयाला मंत्रिमंडळाने मंजुरी देणे किंवा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही मंत्र्याने अशा सवंग घोषणा करण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करा, परस्पर घोषणा करू नका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे परस्पर घोषणा करणाऱ्या मंत्र्यांची चांगलीच कोंडी झाली.