आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीच्या उद्घाटनपुर्वी श्रेयवादाची लढाई:'कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव मिटवता येणार नाही', समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरुन देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा येत्या 1 मे ला म्हणजेच महाराष्ट्र दिनी सुरू होण्याची शक्यता आहे. नागपूर ते शेलू असा 220 किमीचा समृद्धी महामार्गाचा असा पहिला टप्पा आहे. तर नागपूर ते शिर्डीदरम्यानचा समृद्धी महामार्ग जूनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राला समृद्धीकडे नेणारा एक महत्वाचा प्रकल्प आहे. दरम्यान या महामार्गाच्या उद्घाटनाआधीच श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्दावरुन महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे याचा मला आनंद आहे. पण त्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही, हे काम पूर्ण केल्यानंतरच त्याचे उद्घाटन केले तर ते अधिक चांगलं होईल. घाई घाईत उद्घाटन आटपून घेतले तर रस्ता सुरू होईल पण त्या रस्त्याला जे महत्त्व आहे ते महत्त्व कमी होईल. अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, कोणी कितीही प्रयत्न केला, तरी माझे नाव त्याच्यावरुन मिटवता येणार नाही. जनतेने त्यावेळेस मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आणि ही संकल्पना वीस वर्ष माझ्या डोक्यात होती, की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे, त्यावेळी आम्ही तो करू शकलो. त्यावेळी या रस्त्याचा जे मोठ्या प्रमाणावर विरोध करत होते, आता तेच लोकं या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. असा टोला देखील फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे.

या सरकारला थोडीशीही माणुसकी असेल, तर...

समृद्धी महामार्ग हा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तयार झाला आहे. त्यांनी मुख्यमंत्री असताना शेकडो बैठका घेतल्या, प्रत्यक्ष निर्माण स्थळावरचे दौरे केले त्यामुळे वेळेत भूसंपादन झाले. आता प्रकल्प वेळेत पूर्णत्वास येत आहे. आता कोणी कितीही श्रेय घेतले तरी राज्यातील 12 कोटी जनतेला माहिती आहे की, हा प्रकल्प कोणी तयार केला. आता सत्तेत आल्यानंतर श्रेय घेण्यासाठी धावपळ सुरू आहे. या सरकारला थोडीशीही माणुसकी उरली असेल तर त्यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करावे. अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी दिली आहे.

बाळासाहेबांच्या नावाला विरोध नाही

पुढे ते म्हणाले की, या लोकांनी प्रत्येक गोष्टीचा विरोध केला आहे. नानार असो, कोस्टल रोड असो किंवा समृद्धी महामार्ग. सर्वांना विरोध केले आणि आता मात्र आपले नाव देऊन मोकळे होत आहेत. समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव दिले त्याला आमचा विरोध नाही. मात्र आता उद्घाटनाला देवेंद्र फडणवीस यांना बोलावून त्यांच्या हस्ते उद्घाटन करावे. अशी इच्छा मुनगंटीवर यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...