आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृताVठाकरे वादात फडणवीसांची खोचक प्रतिक्रिया:म्हणाले - उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्यात अनेकदा शाब्दिक वाद पाहायला मिळतो. दोघांवरील वादात आता देवेंद्र फडणवीसांनीही उडी घेत मुख्यमंत्र्यांना जोरदार टोला लगावला. ''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणे सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणे सोडत नाही. उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे'' असा खोचक सल्लाही त्यांनी दिला.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाउत्सव कार्यक्रमात अमृता फडणवीसांच्या गाण्यांवरून त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला होता. त्यानंतर अमृता फडणवीसांनी ट्विट करत उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता.

दोघांमधील या शाब्दिक फैरीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अमृता फडणवीस यांची तुलना करत दोघांमध्ये एका बाबतीत साम्य असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माझी पत्नी अमृता यांच्यात एक साम्य आहे. उद्धवजी टोमणे मारणं सोडत नाहीत आणि माझी पत्नी नको त्या गोष्टीला उत्तर देणं सोडत नाही. उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून आपली पातळी वर ठेवली पाहिजे. अशाप्रकारचं काही आल्यानंतर माझ्या पत्नीनेही त्याला उत्तर देण्याचं काही कारण नाही. अशा गोष्टी सोडून द्यायला हव्यात. अर्थात हा त्या दोघांचा प्रश्न आहे. त्यावर मी अधिक बोलणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांचा मीसेस फडणवीसांना टोमणा -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अमृता फडणवीस याचं नाव न घेता टोमणा मारला होता. रामनुकुमार श्रीवास्तव जेव्हा मुख्य सचिव झाले तेव्हा आदित्यने मला सांगितलं की बाबा आपले मुख्य सचिव उत्तम गातात. मला धक्का होता, मला वाटलं आजपर्यंत एकच व्यक्ती गाते, बाकीचे सुद्धा गातात, असे म्हणत त्यांनी अमृता फडणवीस यांना टोला लगावला होता.

तर अमृता फडणवीसांचा पलटवार -

मुख्यमंत्र्याच्या टीकेनंतर अमृता फडणवीस यांनी ट्विटरद्वारे आपला संताप व्यक्त करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला होता. मला सुद्धा धक्का होता, मला वाटलं होतं, अब्जाधीश फक्तं आपणच आहात. आता कळलं आपल्या बायकोचा भाऊ सुद्धा अब्जाधीशच आहे. छान आहे, अशीच गुणी मंडळी जोपासा कुटुंबात, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी पलटवार केला होता.

भाजप आणि शिवसेनेची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध रंगल्याचे पाहायला मिळते. ​​​​​​एकमेंकाना शह-काटशह देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अमृता फडणवीस शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पण, पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी अमृता आणि ठाकरे यांच्यातील वादावर प्रतिक्रिया दिली.

बातम्या आणखी आहेत...