आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जनादरम्यान भाविकांचा मृत्यू:मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख, तर जखमींना 10 लाखांची भरपाई द्यावी; काँग्रेसची मागणी

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गणेश विसर्जनादरम्यान 27 भाविकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख, तर विसर्जनादरम्यान जखमी झालेल्यांना 10 लाखांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले की, बाप्पाच्या विसर्जनामध्ये राज्यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला. ज्याप्रमाणे दहीहंडीच्या कार्यक्रमात मृत्यू झालेल्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याप्रमाणे विसर्जन मिरवणुकीतही मृत्यू व जखमी झालेल्यांना सरकारने अनुक्रमे 25 लाख व 10 लाखांची भरपाई द्यावी.

ही सरकारचीच जबाबदारी

अतुल लोंढे म्हणाले, विसर्जनात मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढूही शकतो. सर्व सार्वजनिक मिरवणुकांमध्ये पोलिसांचे संरक्षण असतानाही मृत्यू होत असेल तर लोकांनी अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या. अनेक कुटुंबातील कर्तीधर्ती माणसं व मुलेच अशा मिरवणुकांमध्ये मृत्यूमुखी पडतात. त्यामुळे अशा कुटुंबांना आधार देणे, ही सरकारची जबाबदारी आहे.

21 बुडाले, 6 जणांचा अपघाती मृत्यू

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा धूमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, गणेश विसर्जनाला राज्यात 27 जणांच्या मृत्यूने गालबोट लागले. 21 जण बुडाले. तर, 6 जणांचा अपघाती मृत्यू झाला.

अहमदनगर जिल्ह्यातील सुपा आणि बेलवाडी येथे गणेश विसर्जन करताना दोन जण पाण्यात बुडाले. नागपूर येथे विसर्जनासाठी जाणाऱ्या चार जणांचा कार अपघातात मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा गणपतीसाठी बनवण्यात आलेले स्टेज कोसळल्याने मृत्यू झाला. पुण्यात एकाचा बुडून मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...