आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात पहिली ते चौथीत शिकणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती आदी प्रवर्गातील सावित्रीच्या लेकींना मागील 30 वर्षांपासून नियमित शाळेत येण्यासाठी दिले जाणारे दैनंदिन 1 रुपया प्रोत्साहनपर अनुदान वाढवून प्रतिदिन किमान 20 रुपये करावे, अशी मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
धनंजय मुंडेंचे ट्विट
धनंजय मुंडे यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली असून आजच्या या महागाईच्या जमान्यात एक रुपयात साधी पेन्सिल तरी मिळते का? असा प्रश्न उपस्थित करत, सावित्रीमाईंच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून अनुदान प्रतिदिन किमान 20 रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घ्यावा अशी मागणी केली आहे.
काय आहे पत्रात?
धनंजय मुंडे यांनी लिहिलेल्या पत्रात, 1992 साली तत्कालीन राज्यसरकारने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून व त्यांनी दाखवलेला स्त्री शिक्षण व सक्षमीकरणाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन आदिवासी क्षेत्राबाहेरील आर्थिक दुर्बल घटकातील तसेच अनुसूचित जाती- जमाती व भटक्या जमातींमधील पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढावी तसेच गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने पहिली ते चौथीत शिकणाऱ्या मुलींना प्रोत्साहन पर उपस्थिती भत्ता देण्यासाठी 'दुर्बल घटकातील मुलींना शाळेत नियमित येण्यासाठी उपस्थिती भत्ता' देण्याचा शासन निर्णय घेतला होता. या अंतर्गत प्रति विद्यार्थिनी, प्रतिदिन 1 रुपया प्रमाणे भत्ता निश्चित करण्यात आलेला असून, वर्षातील एकूण उपस्थितीचे 220 दिवस ग्राह्य धरून याप्रमाणे भत्ता दिला जातो.
शालेय मुलींची चेष्टा
सदर योजनेतील भत्ता वितरीत करण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2022 - 23 मध्ये अद्याप निधीही उपलब्ध नसल्याची वस्तुस्थिती निदर्शनास आली आहे. मागील सुमारे तीस वर्षांपासून या योजनेत काहीही बदल करण्यात आलेले नाहीत. देशाचा स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव आपण साजरा करत असताना दुसरीकडे महागाई आकाशाला गवसणी घालत आहे. अशा परिस्थितीत सावित्रीमाईंच्या नावाने दिल्या जाणाऱ्या या भत्त्याची एक रुपया रक्कम ही शालेय मुलींची चेष्टा करणारी असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
तुटपुंजा भत्ता
आजच्या बाजार भावानुसार एक रुपयात एक पेन्सिल मिळणे सुद्धा दुरापास्त आहे असे असताना शालेय मुलींना उपस्थिती प्रोत्साहन देण्यासाठी दिला जाणारा तुटपुंजा भत्ता देखील वाढविण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.
आज सावित्री माईंची जयंती आपण उत्साहात साजरी करत आहोत, सावित्रीमाईंनी सामाजिक विरोध झुगारून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींना ज्ञानदानाचे पवित्र काम करून स्त्री शिक्षणाची दारे खुली केली. याच पार्श्वभूमीवर बालिका दिनाचे निमित्त साधून शासनाने वरील योजना सुरू केलेली आहे.
भत्ता वाढवण्याची गरज
सध्याच्या आधुनिक युगात देश डिजिटायझेशनकडे वाटचाल करत असताना शिक्षण व त्याला पूरक साधनांमध्ये देखील आमूलाग्र बदल झाले आहेत. या बदलांना अनुसरून व आधुनिक शिक्षण पद्धतींचा अवलंब करून प्राथमिक शिक्षण प्राप्त करण्यासाठी उपरोक्त योजनेचे पुनरावलोकन करून त्यात बदल करणे गरजेचे आहे. तसेच याअंतर्गत मुलींना दिला जाणारा दैनंदिन भत्ता 1 रुपयावरून वरून प्रतिदिन किमान 20 रुपये करणे देखील गरजेचे आहे; असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
तातडीने पुनरावलोकन करा
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने या योजनेचे पुनरावलोकन करून दैनंदिन भत्ता वाढ करण्यासाठी राज्यशासन स्तरावरून एका बैठकीचे तातडीने आयोजन करून निर्णय घ्यावा, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.