आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:पहाटेच्या शपथविधीला साथ देणे धनंजय मुंडेंच्या अंगलट, मंत्रिपद काही काळासाठी काढले जाण्याची शक्यता

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभरापूर्वी झालेला पहाटेचा शपथविधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अंगलट आल्याचे मानले जात आहे. मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. अजित पवार यांनी भाजपबरोबर २३ नोव्हेंबर २०१९ च्या पहाटे स्थापन केलेल्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग संशयास्पद होता. त्या पार्श्वभूमीमुळे मुंडे यांच्यावर रेणू शर्मा आरोपप्रकरणी कठोरातली कठोर कारवाई होणार, असा राष्ट्रवादीत सूर आहे. परंतु काही कालावधीनंतर त्यांचे पुनर्वसन केले जाईल, असे पक्ष सूत्रांनी सांगितले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी सकाळी मुंडे प्रकरण गंभीर असल्याचे नमूद करत सूचक वक्तव्य केले. मुंडे यांना पक्षात अजित पवार यांनी आणले. त्यांना संपूर्ण ताकद दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले. परिणामी मुंडे हे शरद पवार यांच्या विश्वासातली जी मंडळी आहेत, त्या विरोधी गटाचे ठरले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस सरकार स्थापनेच्या वाटाघाटी करत होती, दरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी २० आमदारांना बरोबर घेत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. त्या वेळी या कटाची सर्व सूत्रे धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्यावरून हलली होती. राष्ट्रवादीच्या ज्या आमदारांना २२ नोव्हेंबरच्या रात्री राज्याबाहेर सुरक्षित स्थळी नेले जात होते, ते सर्व मुंडे यांच्या बंगल्यावर जमले होते. मात्र अजित पवार यांचे ते बंड फसले. तेव्हा धनंजय मुंडे यांनी त्या रात्री मी झोपलो होतो. माझ्या बंगल्यावर आमदार जमले, पण त्याची काहीच माहिती नाही, असे स्पष्टीकरण दिले होते.

त्या बंडातील सहभागामुळे मुंडे यांना सामाजिक न्याय खाते शिक्षा म्हणून दिल्याची तेव्हा चर्चा होती. मुंडे यांना त्यांच्या बंडखोरीचे मोठे परिणाम भोगावे लागतील, अशी चर्चा तेव्हा होती. सन २०१२ मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप झाल्यावर सहा महिने त्यांचे मंत्रिपद काढून घेतले होते. तीच पद्धत मुंडे यांच्यासंदर्भात वापरली जाईल, असे राष्ट्रवादीतील सूत्रांचे म्हणणे आहे. त्या धर्तीवर रेणू शर्मा बलात्कारप्रकरणी मंुडे मंत्रिपदाचा राजीनामा अटळ असल्याचे सांगून काही महिन्यांनंतर त्यांचे पुनर्वसन केले जाऊ शकते, असे पक्षातील सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रवादीतील धुसफूस
प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. परिणामी पवारांच्या विश्वासातील मंडळींना अजित पवार कायम पाण्यात पाहतात. त्यातून राष्ट्रवादी पक्षात दोन्ही गटांमध्ये कायम धुसफूस व कुरघोडीचे राजकारण सुरू असते.

बातम्या आणखी आहेत...