आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांदा उत्पादक शेतकऱ्यांची दयनीय अवस्था असून, ते संकटात सापडले पण झोपलेले सरकार कांदा प्रश्नी पेटल्यानंतर आता नाफेड खरेदी सुरू असल्याचा बनाव करीत आहे असा आरोप विधानसभेत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आज केला. याशिवाय 17 गोण्या कांदा विकून 1 रुपया मिळाल्याची पावती फडकावत नाफेडच्या खरेदी व्यवहारावर शंका उपस्थित केली.
रब्बी हंगामातील रांगडा कांदा खरेदीस नाफेडने दोनच दिवसापूर्वी सुरुवात केल्याचे जाहीर केले पण केवळ काही शेकड्यात कांदा नाफेडने खरेदी केला, शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून सरकार बनाव करत आहे, असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी विधानसभेत बोलताना केला.
धनंजय मुंडेंनी सादर केला पुरावा
पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने बोलताना धनंजय मुंडे यांनी राज्यातील कांदा खरेदीची आकडेवारी पुराव्यानिशी सभागृहात मांडली. नाफेडच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील कांदा खरेदीची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून, तोही पुरावा धनंजय मुंडे यांनी सादर केला.
शेतकऱ्यांना दिलासा द्या
बीड जिल्ह्यातील कडा येथील शेतकरी नामदेव लटपटे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी 17 गोण्या कांदा विकल्यानंतर त्याला १ रुपया मिळाला होता, ती पावतीच धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दाखवली. सरकारने कांदा प्रश्नी निर्यात धोरण निश्चित करून तसेच भावांतर योजना राबवुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणीही धनंजय मुंडे यांनी यावेळी केली.
धनंजय मुंडेंची मिश्किल टिप्पणी
दरम्यान राज्यात सत्तांतर झाल्यापासून सगळे आलबेल आहे, असे दाखवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र तसे नाही, हे पुरवणी मागण्यांवरून दिसून येत आहे, अशी मिश्किल टिप्पणीही धनंजय मुंडे यांनी केली.
निधी वाटपात फरक
सुमारे साडेसहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा अभ्यास केल्यास कळते की, भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना तब्बल 87 टक्के निधी देण्यात आला, तर मुख्यमंत्री यांच्यासहित शिंदे गटाचे आमदार मंत्री असलेल्या विभागांना केवळ 13 टक्के निधी देण्यात आला. यावरून कोणाच्या मनात काय सुरू असेल याचा अंदाज येतोच, असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला.
अटल बिहारींच्या कवितेतून सत्ताधाऱ्यांना चिमटे
यावेळी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना उद्देशून धनंजय मुंडे यांनी अटलजींची "छोटे मन से कोई बडा नहीं होता और टूटे मन से कोई खडा नहीं होता", या ओळी म्हणत चांगलेच चिमटे काढले.
तीन गडांना निधी द्या
ग्रामविकास विभागाच्या चर्चेत धनंजय मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात श्री क्षेत्र भगवानगड, श्री क्षेत्र गहिनीनाथ गड व श्री क्षेत्र नगद नारायणगड या तीनही तीर्थस्थळी मंजूर करण्यात आलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातुन प्रत्येकी 25 कोटी रुपये निधी मंजूर करण्याची मागणी केली.
बीड जिल्ह्यात कामे रखडली
बीड जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर असलेल्या 518 किलोमीटर रस्त्याची कामे रखडली असून आवश्यकतेनुसार त्या कामांची निविदा प्रक्रिया पुन्हा राबवून ती कामे पूर्ण केली जावीत, असेही नमूद केले.
अनेक कामांचा निधी अडवला गेला
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सध्या विरोधी बाकांवर असलेल्या सदस्यांच्या मतदारसंघात मंजूर केलेल्या ग्रामीण विकासाच्या अनेक कामांचा निधी सरकारने अडवला आहे, राजकारण बाजूला ठेवून एकात्मिक विकासासाठी त्या स्थगित्या रद्द करून सरकारने तो निधी उपलब्ध करून द्यावा, असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.
याव्यतिरिक्त धनंजय मुंडे यांनी काही विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी ऐन परीक्षेच्या काळात काम बंद आंदोलन केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले, तसेच त्यांना मानसिक त्रास झाला याची दखल शासनाने घ्यावी व याबाबत मध्यस्थी करावी अशी सूचनाही धनंजय मुंडे यांनी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.