आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांकडून पाठराखण:धनंजय मुंडेंना अखेर जीवदान! फिर्यादीबाबत अनेक गोष्टी उजेडात, सत्य समाेर यावे : पवार

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेईन... तक्रारदार रेणू शर्मांचे वक्तव्य

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाची सखोल चौकशी आवश्यक आहे. आरोपी व्यक्तीबाबत अनेक गोष्टी पुढे येत आहेत. त्यामुळे चौकशी झाल्यावर पक्ष निर्णय घेईल. इतक्यात पक्ष मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी दिली.

पवार हे चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसिद्धिमाध्यमांशी बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वरळीतील निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या मोजक्या नेत्यांची बैठक झाली. त्यात धनंजय मुंडे यांना अभय देण्याचा निर्णय झाला.

पवार म्हणाले की, मुंडे यांच्या राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते.

मुंडेंचे मंत्रिपद का वाचले? पक्ष खंबीर, भाजप मोघम, जात फॅक्टर
1.
शुक्रवारी रात्री झालेल्या बड्या नेत्यांच्या बैठकीत धनंजय मुंडे यांना सर्व नेत्यांनी पाठिंबा देत कारवाईसंदर्भात अभय देण्याचा आग्रह धरला.

2. मुंडे प्रकरणात भाजपची भूमिका तळ्यात-मळ्यात आहे. त्यामुळे हे प्रकरण लवकरच शांत होण्याची पक्षाला खात्री आहे. तथापि, मुंडे यांना कारवाईपासून पक्षनेतृत्वाने दिलेले अभय काही काळापुरतेच असणार आहे.

3. वंजारी जातीचा एकमुखी पाठिंबा अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण, या गोष्टी मुंडेंच्या अभयास कारणीभूत ठरल्या.

चौकशीत एसीपी दर्जाची महिला अधिकारी असावी
पोलिस विभाग चौकशी करेल. त्यात आमचे हस्तक्षेप करण्याचे कारण नाही. चौकशी करताना सहायक आयुक्त दर्जाची महिला अधिकारी त्यात असावी. या प्रकरणाची सर्व माहिती त्यांनी पुढे आणावी, अशी सूचना पवार यांनी केली.

‘गंभीर’च्या वक्तव्याबाबत : आता या प्रकरणाला वळण मिळालेय
शरद पवार म्हणाले, मी काल आरोप गंभीर असल्याचे म्हटले होते. मात्र तेव्हा संपूर्ण चित्र नव्हते. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये. कृष्णा हेगडे व मनीष धुरी ही उदाहरणे नसती तर वेगळा विचार केला असता. पण या प्रकरणाला वळण मिळालेय. वस्तु:स्थिती समोर येईपर्यंत थांबावे लागेल.

शपथपत्रातील माहितीबद्दल : तांत्रिक गोष्टी बघाव्या लागतील
शपथपत्रात मुंडे यांनी माहिती लपवल्याच्या आरोपासंदर्भात प्रश्न विचारल्यावर पवार म्हणाले की, त्यातील काही तांत्रिक गोष्टी बघाव्या लागतील. देशात अशा अनेक गोष्टीही झाल्या आहेत. देशातील सर्वोच्च प्रमुखांच्या बाबतीतही अशा गोष्टी झाल्या आहेत. त्याच्या खोलात जायची गरज नाही. सत्ता हातून गेल्याने काही जण अस्वस्थ आहेत, असा टोला पवार यांनी लगावला.

सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेईन... तक्रारदार रेणू शर्मांचे वक्तव्य
मुंबई | मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा म्हणाल्या, तुम्हा सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते. मी खोटी आहे, हे सिद्ध करण्यासाठी एवढ्या लोकांना एकत्र यावे लागते आहे. मी विरुद्ध महाराष्ट्र असे चित्र आहे. तुम्हाला जे लिहायचे ते लिहा. जर मी चुकीची होते तर एवढ्या दिवसांत माझ्याविरोधात तक्रार का केली नाही? मला पाठीमागे हटावे लागले तरी मला गर्व आहे की, मी एकटी लढले.

मुंडेंकडून दबाव : रेणूंच्या वकिलाचा आरोप
दरम्यान, रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी आपल्याला धनंजय मुंडे समर्थकांकडून धमकावले जात आहे, अशी तक्रार देत पोलिस संरक्षणाची मागणी केली. त्रिपाठी म्हणाले, रेणू शर्मा यांनी गुन्हा नोंद करू नये यासाठी मंत्री मुंडे यांच्याकडून दबाव टाकला जात आहे. तक्रार दाखल केली तर शर्मा कुटुंबीयांना खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकीन, अशी धमकी मुंडे यांनी दिल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. मुंडेंविरुद्ध आमच्याकडे पुरावे आहेत. ते आम्ही पोलिसांकडे देऊ. या प्रकरणात पोलिस शनिवारी गुन्हा दाखल करतील अशी आशा आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल नाही केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशारा त्रिपाठी यांनी दिला आहे.

रेणू यांच्यावरील बलात्काराची चित्रफीत काढण्यात आली होती. ही चित्रफीत समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्याची धमकी तिला वेळोवेळी देण्यात आली. त्यामुळे तिने अद्याप तक्रार दाखल केली नव्हती, असेही त्रिपाठी म्हणाले. इतर काही नेत्यांनी रेणूवर आरोप केले आहेत. मुंडेंविरोधातील प्रकरण कमकुवत करण्याचा हा प्रकार आहे. आरोप करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडून आम्हाला नोटीस आलेली नाही, असे त्रिपाठी म्हणाले.

मेहुण्याची रेणूविरुद्ध तक्रार : रेणू शर्मा ही मुंडे यांना ब्लॅकमेल करत आहे, अशी तक्रार आपण काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांत दिली होती, अशी माहिती मुंडेंचे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रेकर यांनी दिली.

हायकोर्टात याचिका : शपथपत्रात दोन अपत्यांची माहिती लपवल्याप्रकरणी मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्याची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली.

बातम्या आणखी आहेत...