आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद आता संभाजीनगर:मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, उस्मानाबादचे होणार धाराशीव; नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबई विमानतळाचे दि. बा. पाटील असे नाव करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेकडून नामांतराचे प्रस्ताव ठेवण्यात आले होते.

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड आणि राज्यभरात सुरू असलेला सत्तासंघर्ष पाहता या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता होती. त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी इतक्या दिवस महाविकास आघाडीचे नाव पुढे करत गुंडाळून ठेवलेले भावनिक विषय पुन्हा एकदा बाहेर काढले. विशेष म्हणजे येणाऱ्या काही काळात औरंगाबाद, मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर हे निर्णय घेण्यात आले आहेत.

कधीची होती मागणी?

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी जुनी होती. 1988 मध्ये औरंगाबादेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादच्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी औरंगाबादचे नाव संभाजीनगर ठेवल्याची घोषणा केली. तेव्हापासून शिवसैनिक औरंगाबादला संभाजीनगर म्हणत. तर शिवसेनेकडून उस्मानाबादचे नाव धाराशीव ठेवा अशी होती. शिवसेनेच्या सामना मुखपत्रातूनही औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर आणि उस्मानाबादचा उल्लेख धाराशीव केला जायचा.

नामांतर कुठे अडले होते?

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यासाठी जून 1995 मध्ये औरंगाबाद महानगरपालिकेत ठराव मंजूर झाला. तो राज्य सरकारकडे पाठवला. त्यावेळी राज्यात युतीचे सरकार होते. मात्र, या निर्णयाला उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. त्यानंतर 1996 मध्ये सरकारने संभाजीनगर नावावर आक्षेप आणि सूचना मागवणारी अधिसूचना काढली. या अधिसूचनेलाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेले. या काळात आघाडी सरकार आले. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी ही अधिसूचना मागे घेतली. औरंगाबाद महापालिकेत 2010 मध्ये शिवसेना-भाजप सत्तेत आले. त्यांनी 2011 मध्ये पुन्हा औरंगाबादचे नामांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारडे पाठवला. मात्र, काँग्रेस -राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव फेटाळला. त्यानंतर 2015, 2017 मध्ये नामांतराची मागणी झाली.

स्थानिकांचा विरोध कामी

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. खरे तर नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात येणार होते. राज्य सरकारने तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. मात्र, या निर्णायाला विरोध करत स्थानिकांनी दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी केली. त्यासाठी स्थापन झालेल्या कृती समितीने मानवी साखळी करून आंदोलन केले. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोण आहेत दि. बा.?

दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष होते. महाराष्ट्रातल्या पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे 4 वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार पदही त्यांनी भूषवले. 'सिडको' त्याकाळी नवी मुंबईची बांधणी करत होती. तेव्हा पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. जासई येथील संघर्षात पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला. शेतकरी-कष्टकऱ्यांच्या पाठिमागे उभे राहिले. पोलिसांच्या काठा खाल्ल्या. अनेकदा तुरुंगवास भोगला आहे.

आझमींनी केला विरोध

समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मात्र सरकारच्या नामांतर निर्णयाचा विरोध केला आहे. आझमी म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याच्या निर्णयाचा मी निषेध करतो. मुस्लिम आरक्षणाकडेही दुर्लक्ष करण्यात आले. आमचा पाठिंबा कॉमन मिनिमम प्रोग्राम अंतर्गत आहे, पण आता #MVA सुद्धा भाजप करते तेच करत आहे. मी शरद पवार, अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना सांगू इच्छितो की, या निर्णयामुळे महाराष्ट्रातील मुस्लिमांमध्ये महाविकास आघाडीकडून फसवणूक झाल्याची आणि बाजूला सारल्या गेल्याची भावना आहे.