आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांभीर्य ओळखा:मुंबई, पुणे, औरंगाबादेत मास्क न वापरल्यास होणार थेट अटक; नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांकडून कठोर पाऊल

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मुंबईत एकाची रुग्णाची तपासणी करताना आरोग्य अधिकारी. - Divya Marathi
मुंबईत एकाची रुग्णाची तपासणी करताना आरोग्य अधिकारी.
  • औरंगाबादेत पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा

वैयक्तिक किंवा कार्यालयीन अथवा कुठल्याही कारणांसाठी सार्वजनिक ठिकाणी मुंबईकरांना घराबाहेर पडायचे असल्यास मास्क किंवा रुमाल घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क तोंडाला लावला नसल्यास संबंधिताला अटक करण्यात येईल, असे आदेश मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी बुधवारी जारी केले आहेत. दरम्यान, मुंबईची लाेकसंख्या दीड कोटी असून राज्यात केवळ अडीच लाख मास्क असल्याचे चित्र आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून त्याचा मुंबईत मोठा प्रादुर्भाव झालेला आहे. मंगळवारपर्यंत मुंबईत ६४२ कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून ४० रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. त्यामुळे पालिकेने कोरोना संसर्गाला चाप लावण्यााठी कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून मास्क घातल्याशिवाय कुणीही बैठकांना किंवा कुठल्याही कार्यक्रमाला बसू नये, असे पालिकेने जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे.  राज्यात लागू करण्यात आलेल्या ‘साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७’ नुसार ‘महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना नियम २०२०’ अन्वये महापालिका आयुक्त यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मास्क वापरण्याच्या सक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पालिका आयुक्यांच्या आदेशानुसार रस्ते, हाॅस्पिटल, कार्यालये, बाजारपेठा अशा सर्व ठिकाणी शक्यतो ३ थराचा  किंवा चांगल्या पद्धतीने घरी बनवलेला स्वच्छ व धुवून वापरता येणारा मास्क घालणे बंधनकारक आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महापालिका सहाय्यक आयुक्त यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस किंवा सहाय्यक आयुक्त यांनी प्राधिकृत केलेले अधिकारी कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

औरंगाबादेत पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने  बुधवारी पोलिसांनी शहरात कडक निर्बंध लागू केले असून रात्री सात ते ११ पर्यंत कोणीही बाहेर फिरणार नसल्याचे आदेश काढले. तसेच मास्क न लावता फिरणाऱ्यांना थेट अटक करण्याचा इशारा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिला.

पुण्यात सर्वांना मास्क घालणे बंधनकारक

डाॅक्टर व रुग्णांनी मास्क वापरावा. इतरांनी रुमाल तोंडावर बांधावा, असे आजपर्यंत पालिका म्हणत हाेती. त्याच पालिकेने आता मास्कच्या सक्ती केली आहे.  कोरोना विषाणूंचा प्रसार कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच जिल्हयात अधिकारी / कर्मचारी यांना त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविण्याच्या दृष्टीने सूचना निर्गमित करण्यात आल्याचे पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले आहे. पुणे महानगर विकास क्षेत्रात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादूर्भाव विचारात घेता, सर्व कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांना कार्यालयीन प्रवेशद्वारापासून ते कार्यालय सोडेपर्यंतच्या कालावधीमध्ये चेहऱ्यावर मास्क परिधान करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...