आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला आयोगाकडे धाव:दिशा सालियानच्या आई-वडिलांनी घेतली महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची भेट, बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची केली मागणी

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात दिशा सालियन प्रकरणावरुन पुन्हा एकदा राजकारण सुरु झाले आहे. राजकीय मंडळी एकमेकांना आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात दिशाच्या कुटुंबीयांनी त्यांना भावनिक त्रास होत असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी आज महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांची भेट घेतली आहे. तसेच बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

यावेळी दिशाच्या आई-वडीलांनी आपल्या मुलीची तिच्या मृत्यू पश्चात होणारी बदनामी ही त्यांच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना समाजात सन्मानाने जगता येत नसल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तिच्या मृत्यूबद्दल प्रसार माध्यमातून खोटी माहिती जाहीर करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व इतर सर्व संबंधितांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली आहे. याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच याबाबत सालियान कुटुंबियांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे असे म्हटले आहे.

आमच्या मुलीला बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?
दरम्यान मंगळवारी दिशाच्या पालकांनी भावनिक साद घातली होती. दिशा तर गेली, आम्ही त्या दुःखातून सावरण्याचे प्रयत्न करत आहोत. पण काही जण याचे राजकारण करत आहेत. पुन्हा, तेच-तेच आरोप करुन आमच्या मुलीला बदनाम करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला आहे. आम्हाला त्रास देऊ नका, आम्हाला किमान जगू द्या. अशी भावनिक साद दिशा सालियनची आई वसंती सालियन यांनी घातली आहे. आज राज्य आयोगाच्या दोन सदस्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे भाष्य केले.

दिशाची आई वसंती सालियन यांनी म्हटले आहे की, महापौर किशोरीताई पेडणेकर आम्हाला भेटायला आल्या. त्यामुळे आम्हाला थोडासा दिलासा मिळाला. दिशाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी पाच वेळा तपास केला. आता आम्ही कुठे त्या दुःखातून सावरत आहोत. मात्र राज्यात तिला पुन्हा बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहे. हा हक्क त्यांना कुणी दिला. असा सवाल वसंती सालियन यांनी उपस्थित केला आहे.

बातम्या आणखी आहेत...