आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:केंद्राच्या आर्थिक मदतीवरून आघाडी-भाजपत ‘वित्तंडवाद’

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेबत थोरात, जयंत पाटील, अजित परब - Divya Marathi
पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेबत थोरात, जयंत पाटील, अजित परब
  • केंद्राकडून स्वतंत्र निधी मिळाला नाही, राज्य सरकारचा आरोप
  • तीन मंत्र्यांची पत्रपरिषद म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल... : फडणवीस यांचा हल्लाबोल

कोरोना संकट एकीकडे गहिरे होत असताना केंद्र सरकारच्या मदतीवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात नवा वितंडवाद सुरू झाला आहे. श्रमिक रेल्वेंच्या प्रकरणावरून राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून केंद्र सरकारकडून राज्याला कोणताही स्वतंत्र निधी मिळाला नसल्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले. केंद्र सरकारने महाराष्ट्राला २८ हजार १०४ कोटी रुपयांची मदत दिल्याचा दावा करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप मंगळवारी केला होता. त्यांच्या आरोपांना बुधवारी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिले. शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते.

श्रमिक रेल्वेसाठी मजुरांना स्टेशनवर पोहोचवल्यानंतर अचानक रेल्वे दुसऱ्या स्थानकावरून सुटणार अशी घोषणा केली जात होती. हा गोंधळ जाणीवपूर्वक निर्माण केला जात होता, असे परब म्हणाले.

गोंधळ निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न : थोरात

मजुरांसाठी ट्रेन सोडण्याबरोबरच जे पायी जात होते त्यांचीही काळजी घेतली गेली. बसेसने त्यांची रेल्वेस्टेशनपर्यंत जाण्याची सोय केली. मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असली तरी हॉस्पिटलची व्यवस्था केली आहे, कोणाची गैरसोय होणार नाही याकडे लक्ष देत आहोत. पण, विरोधी पक्ष सहकार्य करण्याऐवजी वेगळी मोहीम उघडून गोंधळ निर्माण करीत आहे. आमची मानसिकता ढळू देणार नाही, महाराष्ट्र कोरोनामुक्त करणारच, असे काँग्रेस प्रदेेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

मोफत साहित्य सांगून केंद्राने पैसे घेतले : जयंत पाटील

केंद्र सरकारने मोफत साहित्य देऊ असे सांगितले, परंतु नंतर पैसे घेतले. राज्य सरकारने केलेल्या मागणीपैकी एन-९५ मास्क आणि पीपीई किट्सची फक्त ३० टक्के पूर्तता केंद्राने केली. भारतात कोरोनाग्रस्तांचे उत्तम काम मुंबई आणि महाराष्ट्रात झालेले आहे. डब्ल्यूएचआे आणि केंद्रीय टीमने राज्यात मेअखेरपर्यंत १.५ लाख कोरोनाग्रस्त होतील, असे म्हटले होते; परंतु आमच्या अंदाजानुसार फक्त ६० हजार केसेस होतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

हक्काचे १८ हजार कोटी मिळाले नाहीत : महाविकास आघाडीचे उत्तर

> १७५० कोटी रुपयांचा गहू महाराष्ट्राला मिळालेला नाही.

> मजूर गावी गेल्यानंतर १२२ कोटींची ऑर्डर निघाली 

> विधवा, दिव्यांग आणि इतरांना केंद्राकडून ११६ कोटी, उर्वरित १२१० कोटी महाराष्ट्र सरकारचे

> परप्रांतीय मजुरांसाठी ६०० रेल्वेंचा खर्च राज्य सरकारने केला 

> सन २०१९-२० मधील हक्काचे १८ हजार कोटी मिळाले नाहीत

> ९ हजार कोटी कापूस, धान, चणा-मका अशा शेतमाल खरेदीसाठी दिल्याचा दावा खोटा.

> शेतकरी कर्जमाफी योजनेत आघाडी सरकारकडून १२ हजार कोटींचे वाटप 

> मजुरांच्या छावण्यांसाठी १६११ कोटींचा दावा. दरवर्षी ४६०० कोटी आपत्ती व्यवस्थापनाचे मिळतात, हे त्यातलेच पैसे.

सत्य सांगायला एक, फेकाफेकीसाठी ३ लोक लागतात : फडणवीस

मुंबई | माझ्या पत्रपरिषदेला उत्तर देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने मंत्र्यांना तासन‌्तास बैठका घ्याव्या लागल्या. एवढ्या बैठकी कोरोनाविरोधातील लढाईसाठी घेतल्या असत्या, तर महाराष्ट्राचे चित्र आज असे नसते, असे सांगतानाच सत्य सांगायला एकच व्यक्ती पुरे असते, पत्रपरिषदेला तीन लोक लागतात, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला. केंद्राकडून पैसे मिळत नाहीत, हे सांगताना दरवेळी नवीन आकडा फेकला जातो. कधी १८ हजार तर कधी १६ हजार कोटी. जीएसटीचे पैसे नोव्हेंबर ते डिसेंंबरपर्यंतचे आले आहेत. जानेवारी ते मार्चच्या बाबतीत निर्णय जीएसटी कौन्सिल घेणार आहे. या तीन मंत्र्यांची पत्रपरिषद म्हणजे खोटे बोल पण रेटून बोल असा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली

बातम्या आणखी आहेत...