आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:चक्रीवादळातील मदत वाटपावरून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद; ठाकरे, अजित पवारांची मध्यस्थी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालकमंत्री अदिती तटकरेंच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेचा आक्षेप

निसर्ग चक्रीवादळातील मदत वाटपावरून रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद उभारला आहे. हा वाद गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दरबारी पोचला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही बाजूंच्या नेत्यांची समजूत घालून समेट घडवून आणला आहे.

दादरच्या ठाकरे स्मारकात गुरुवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात निवडक कार्यकर्त्यांसह तासभर बैठक झाली. त्याला राष्ट्रवादीचे अलिबागचे खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे, शिवसेनेचे महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे उपस्थित होते. या वेळी पालकमंत्री अदिती तटकरे जिल्ह्याच्या कारभारात शिवसेना नेत्यांना विश्वासात घेत नाहीत, असे महाडचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितल्याचे समजते. तेव्हा पालकमंत्र्यांनी विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. कारण महाविकास आघाडी तिन्ही पक्षांची मिळून बनली आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन कामे होणे आवश्यक असल्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी बैठकीत केल्याचे समजते.

पुढील निवडणुका एकत्र लढवायच्या आहेत....

बैठकीत उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न झाला. यापुढे आपल्याला महाविकास आघाडी म्हणून एकत्र राहायचे आहे. तसेच २०२० च्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासुद्धा एकत्र लढवायच्या आहेत, असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.