आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शह-काटशह:विद्युत मंडळात काँग्रेसने केलेल्या नियुक्त्यांवरून आघाडीमध्ये नाराजी; नियुक्त्या रद्द करण्याची शिवसेना, राष्ट्रवादीची मागणी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापारेषण व विद्युत वितरण कंपनीवर आठ संचालकांची नियुक्ती ऊर्जामंत्र्यांच्या निर्णयावर मित्रपक्षांचा आक्षेप

महापारेषण आणि विद्युत मंडळ कंपनीच्या संचालकपदावर केलेल्या नियुक्त्यांवरून महाविकास आघाडीत पुन्हा नाराजी निर्माण झाली आहे. ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डाॅ.नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनी व विद्युत वितरण कंपनीवर केलेल्या आठ संचालकांच्या नियुक्त्या वादात सापडल्या आहेत. नियुक्त्यापूर्वी आमच्याशी चर्चा का केली नाही, असा आक्षेप शिवसेना आणि राष्ट्रवादीने घेतला आहे.

महापारेषण कंपनीवर १५ जुलै रोजी चार संचालकांची नेमणूक केली. त्यासाठी एमएसईबी होल्डिंग कंपनीने महापारेषणला तशी शिफारस केली होती, तर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळावर २० जुलै रोजी चार संचालक नियुक्त केले आहेत. दरम्यान, या प्रकरणी भाष्य करण्यास ऊर्जामंत्री राऊत यांनी नकार दिला.

मुंबईतील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून वाद

मध्यंतरी राष्ट्रवादीने गृह विभागातील १० मुंबई पोलिस उपायुक्तांच्या बदल्या केल्या होत्या. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेतला होता. मुख्यमंत्र्यांनी सर्व बदल्या रद्द केल्या होत्या. त्यावर खुद्द शरद पवार यांना मध्यस्थी करावी लागली होती. त्यानंतर ‘प्रथम चर्चा, मग नियुक्त्या’ असे धोरण आघाडीत स्वीकारले होते.

प्रथम चर्चा, मग नियुक्ती धोरण धाब्यावर : 

महत्त्वाच्या नियुक्त्या करताना ‘प्रथम चर्चा, नंतर नियुक्त’ असे धोरण महाआघाडीत मान्य केले आहे. मग, या नियुक्त्या करताना काँग्रेसने इतर दोन्ही घटकपक्षांशी चर्चा का केली नाही, असा सवाल शिवसेना-राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे. तसेच काँग्रेसने केलेल्या या नियुक्त्या रद्द कराव्यात अशी मागणीसुद्धा केली आहे.

या काँग्रेस नेत्यांची वर्णी

> महापारेषणवर काँग्रेसचे यवतमाळचे माजी आमदार कीर्ती गांधी, जळगावमधील जामनेरच्या काँग्रेस नेत्या ज्योत्स्ना विसपुते, महावितरणचे कार्यकारी संचालक राहिलेले पुण्याचे उत्तम झाल्टे आणि कोल्हापूरचे बाॅबी भोसले यांचा समावेश आहे.

> महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या वितरण कंपनीवर बीड जिल्ह्यातील केजचे अशाेक पाटील, नागपूरचे सचिन मुकेवार, नागपूरचे नितीन कुंबलकर आणि बीडचे रवींद्र दळवी या अशासकीय सदस्यांचा समावेश आहे.