आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांचा मुख्यमंत्र्यांना निरोप:उद्धवजी, हे वागणं बरं नव्हं!; घाईघाईने पुन्हा राज्यात कोरोना निर्बंध लादल्याने नाराजी; पवारांची नाराजी दूर करता-करता संजय राऊत यांची दमछाक

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या 100 सदनिका वाटपाच्या निर्णयास स्थगिती

महाविकास आघाडी सरकारमध्ये सर्व काही अालबेल असल्याचे भासवले जात अाहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट आघाडीचे कर्तेधर्ते शरद पवार यांनी उद्घाटन केलेल्या प्रकल्पालाच दिलेली स्थगिती आणि तिसऱ्या लाटेचा धसका घेऊन घाईघाईने राज्यावर लादलेले निर्बंध या दोन निर्णयांमुळे आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. त्यामुळे सोमवारी “उद्धवजी, हे वागणं बरं नव्हं,’ असा संदेश पवारांनी शिवसेना दूतामार्फत मुख्यमंत्री ठाकरेंना पाठवला आहे. ठाकरेंच्या धरसोडीच्या निर्णयांबद्दल तीव्र नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कळवली आहे.

त्यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी सोमवारी भेटून सविस्तर चर्चा केली. वर्षा बंगल्यावर उभय नेत्यांमध्ये सुमारे दीड तास बंदद्वार चर्चा झाली. त्यानंतर राऊत पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर गेले. ते सुमारे २०-२५ मिनिटे तिथे होते. दुसरी लाट ओसरत असून तिसऱ्या लाटेचा सहा महिने धोका नाही, असे केंद्रीय संस्थांनी स्पष्ट केले असताना राज्यव्यापी निर्बंध मुख्यमंत्र्यांनी कशासाठी लावले, असा प्रश्न पवारांनी केला. दरम्यान, पवारांच्या भेटीनंतर सर्वकाही आलबेल असल्याचे संजय राऊत भासवत होते.

राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा निर्णय फिरवला
गृहनिर्माणमंत्री व राष्ट्रवादीचे नेते डाॅ. जितेंद्र अाव्हाड यांनी मुंबईत उपचारांसाठी येणाऱ्या कॅन्सर रुग्णांच्या नातेवाइकांसाठी शिवडीत म्हाडाच्या १०० सदनिका टाटा रुग्णालयास १ रुपया नाममात्र किमतीत दिल्या होत्या. शिवडीचे शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत त्याबाबत तक्रार केली. त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी आव्हाड यांच्या निर्णयाला स्थगिती देऊन टाकली होती. आश्चर्य म्हणजे शरद पवार यांच्या हस्ते या सदनिकांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम झाला होता. राष्ट्रवादीच्या तीव्र आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवडीऐवजी भोईवाड्यात १०० सदनिका दिल्या. मात्र स्वपक्षाच्या आमदारासाठी मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने पवार यांना धक्का बसला होता.

आघाडीच्या नेत्यांशी चर्चेविनाच निर्बंध लादले
कोरोनाच्या निर्बंधांबाबत मुख्यमंत्री धरसोड करत आहेत. ४ जून रोजी कोरोनाग्रस्त जिल्ह्यांचे ५ स्तर केले हाेते. लगेच २१ दिवसांत ते बदलून ३ स्तर केले. परिणामी कोरोना कमी झालेले अनेक जिल्हे निर्बंधांत अडकले आहेत. नव्याने घातलेल्या कोरोना निर्बंधांची चर्चा मुख्यमंत्र्यांनी आघाडीच्या नेत्यांशी केलेली नव्हती. प्रशासनाने इतक्यात कठोर निर्बंधांची गरज नसल्याचे मुख्यमंत्र्यांना अवगत केले होते.
1. संजय राऊत यांच्यामार्फत शरद पवार यांनी प्रशासनात अशी धरसोड चालणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांना बजावल्याचे समजते.
2. कोरोना हाताळणीबरोबरच राज्याचे अर्थचक्र फिरणे तितकेच महत्त्वाचे आहे. ते कोरोनाच्या अतिकाळजीने थांबवू नका, अशी समज पवारांनी दिल्याचे कळते.
3. महाविकास आघाडी सरकारात समन्वय समिती आहे. त्यांच्याशी मोठे निर्णय घेताना चर्चा करा. इतर दोन्ही पक्षांना बरोबर घेऊन चला, असे पवारांनी कळवल्याचे समजते.

सरकार स्थिर
राऊत-उद्धव भेटीमुळे अाघाडी सरकार अस्थिर झाल्याच्या चर्चा आहेत. मात्र असे काही नाही, मुख्यमंत्र्यांच्या काही निर्णयांवर पवारांची नाराजी आहे, त्यावर दोघांत चर्चा झाल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...