आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Distribution Of Mathadi Bhushan Awards In Navi Mumbai Efforts To Solve Problems Of Mathadi Workers; We Will Increase The Fund Chief Minister Eknath Shinde

माथाडी भूषण पुरस्कारांचे नवी मुंबईत वितरण:कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; निधीत वाढ करू - मुख्यमंत्री

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ केली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

माजी आमदार स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या 89 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनच्या वतीने तुर्भे येथील एपीएमसी मार्केटमध्ये आयोजित माथाडी कामगार मेळावा आणि गुणवंत कामगार पुरस्कार, माथाडी भूषण पुरस्कार वितरण सोहळा झाला. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगार मंत्री सुरेश खाडे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश शिंदे, माजी आमदार नरेंद्र पाटील, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक आदी उपस्थित होते.

कष्टकरी, मेहनती माथाडी बांधवाचे नेते म्हणजे आपले स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांना विनम्र अभिवादन करतो, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, अण्णासाहेब पाटील यांचं सामाजिक, राजकीय व कामगार क्षेत्रातील योगदान मोलाचं आणि आजही सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. स्व. अण्णासाहेब यांनी मराठा समाजातील तरुणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दूरदृष्टीनं अनेक योजना, प्रकल्पांची मांडणी केली.

माथाडी कामगारांचे अनेक रखडलेले प्रश्न पुढील काळात मार्गी लावण्यात येतील. माथाडी कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यासाठी मुंबई बँकेच्या मदतीने निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी उपसमिती स्थापन झाली आहे. तसेच मराठा युवकांच्या शासकीय नोकरीत नियुक्तीसाठी अधिसंख्य पदे निर्माण केली असून नियुक्ती प्रक्रिया सुरू केली आहे. स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळ व सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजात नवीन उद्योजक तयार होण्यासाठी अनेक योजनांवर राज्य शासन काम करत आहे.महामंडळाची जबाबदारी पुन्हा एकदा माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर सोपविण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

राज्य शासनाने गेल्या अडीच महिन्यात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यात पोलिस भरती प्रक्रिया आणि 75 हजार रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवी मुंबईतील माथाडी तसेच भूमीपुत्रांना न्याय देण्यात येईल. नवी मुंबईतील प्रकल्पाना चालना देण्यात येईल. राज्याच्या विकासासाठी केंद्र शासनही आपल्यामागे खंबीरपणे उभे आहे, असेही मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, मागील 2014 ते 2019 च्या काळात माथाडी कामगारांच्या अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेतले. अनेक प्रश्न सोडविले. या काळात स्व.अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्जीवित केले. त्यामाध्यमातून मागील काळात 50 हजार मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी मिळाली. माथाडी कामगाराच्या घराचा प्रश्न सोडविणे कठीण होते. पण जास्तीचा एफएसआय देऊन तो प्रश्न मार्गी लावला. या पुढील काळातही यासाठी निधी कमी पडू देणार नाही. माथाडी कामगारांचे उर्वरित प्रश्न निश्चितपणे सोडविल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या लेव्हीचा प्रश्नही बैठक घेऊन लवकरच सोडविणार आहे. माथाडी कामगारांच्या चळवळीच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत. माथाडी कामगार संघटनामध्ये घुसलेल्या अपप्रवृत्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. हे सरकार सर्वसामान्यांचे निर्णय घेणारे सरकार आहे. मुख्यमंत्री महोदय हे काल नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी दोन तास पायी चालत होते. हे जनतेच्या मनात कोरले जाते, असेही फडणवीस म्हणाले.

कामगार मंत्री सुरेश खाडे म्हणाले की, कोरोना काळात माथाडी कामगारांनी महत्वपूर्ण काम केले आहे. माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच सकारात्मक निर्णय घेऊ. माथाडी कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये माथाडी कामगारांच्या समस्या मांडल्या. माथाडी कामगारांना वडाळा ट्रक टर्मिनल येथील घरांसाठी कर्ज उपलब्ध द्यावेत. नाशिक येथील लेव्हीचा प्रश्नही तातडीने सोडविण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. आमदार श्री नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांनी स्व अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माथाडी भूषण पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले