आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री आज संवाद साधणार:आजपासून जिल्हाबंदी शक्य, रात्रीपासून कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध लागण्याची शक्यता

कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही लोक सर्रास रस्त्यावर गर्दी करीत असल्याने राज्यात १५ दिवसांचा कडक लाॅकडाऊन करण्याचा एकमुखी निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतांश मंत्र्यांनी लाॅकडाऊनची एकमुखी मागणी केली. राज्यव्यापी लाॅकडाऊमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध टाकण्यात येणार आहेत. जिल्हाबंदीसुद्धा केली जाऊ शकते तसेच मुंबईची लोकल केवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी चालवली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी राज्याला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री त्या जनसंवादामध्ये लाॅकडाऊनची घोषणा करतील, असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कडक निर्बंधांऐवजी लॉकडाऊन करावा, अशी भूमिका अनेक मंत्र्यांनी बैठकीत मांडली. या बैठकीला राज्यमंत्र्यांना बोलवण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सार्वत्रिक लसीकरणाचा मुद्दा उपस्थित केला. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी कितीही खर्च येवो, पण लवकरात लवकर राज्यातील नागरिकांचे लसीकरण केले पाहिजे, अशी भूमिका पवार यांनी मांडली. राज्य सरकारच्या मालकीचा किमान शंभर टन क्षमतेचा आॅक्सिजन निर्मितीचा प्रकल्प तातडीने स्थापन केला पाहिजे, अशी मागणी नगरविकास राज्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत केली.

कोरोना रुग्णांना सोयीसुविधा पुरवण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याने सरकारविरोधात संताप वाढतो आहे. त्यामुळे बिथरलेल्या मंत्र्यांनी लाॅकडाऊनचे हत्यार उपसून काहीशी उसंत मिळवण्याचा बैठकीत प्रयत्न केला. मात्र लॉकडाऊनचा कालावधी नेमका कधीपर्यंत असेल याबाबत संभ्रम आहे.

तीन महिन्यांत ६० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट
४५ वयाच्या पुढील नागरिकांच्या लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र सरकारचा आहे. मात्र १८ ते ४५ वर्षे वयाेगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्य सरकारला पुढाकार घ्यायचा आहे. त्यासाठी खुल्या बाजारातून लस खरेदीची केंद्र सरकारने परवानगी द्यावी व तीन महिन्यांत राज्यातील ६० टक्के नागरिकांचे लसीकरण व्हावे, अशी भूमिका राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडली.

किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी सकाळी फक्त ४ तास उघडे
राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने , डेअरी, बेकरी, कन्फेक्शनरी, खाद्यपदार्थांची सर्व दुकाने, कृषी उत्पादनाशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकाने दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतील. मात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत घरपोच सेवा देता येईल.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा आधी विरोध, आता जनतेचा रोष पाहून आग्रह
कोरोनाची दुसरी लाट थोवपण्यासाठी लाॅकडाऊनची आवश्यकता मुख्यमंत्री मांडत होते. त्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी विरोध केला होता. लाॅकडाऊनपूर्वी गोरगरिबांसाठी पॅकेज जाहीर करा,अशी मागणीही काँग्रेसने केली होती. त्यानुसार ठाकरे सरकारने सुमारे ५,४७६ कोटींचे पॅकेज जाहीर केले.त्यानंतर राज्यात कडक निर्बंध लागू करूनही कोरोना स्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून त्याच मंत्र्यांनी एकमुखाने कडक लाॅकडाऊनचा आग्रह धरला आहे.

बातम्या आणखी आहेत...