आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:उद्ध्वस्त बागा, उजाड जागा ... परि उभारी देई सकारात्मकतेचा धागा, क्रूर चक्रात सापडलेल्या कोकणातील संपूर्ण बागायती पट्ट््यात नवउभारणीची लगबग

कोकण (अभिजित कुलकर्णी)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल एक लाख झाडांची पडझड... ‘निसर्ग’ चक्रीवादळात जिल्ह्यातील केवळ झाडांच्या झालेल्या नुकसानीचा हा छाती दडपून टाकणारा शासकीय आकडा. जिल्ह्याचे मुख्यालय असलेले अलिबाग सोडून आक्षी, नागाव, हटाळेमार्गे आपण पुढे सरकतो आणि नारळ-सुपारीच्या कोसळलेल्या वाड्यांच्या भयाण दर्शनानं हादरून जातो. ‘आमची पण पहिले चार-पाच दिवस घरातून बाहेर पडण्याची हिंमत होत नव्हती,’ वाडीभर पडलेल्या झावळ्या सारख्या करत विकास ठाकूर सांगत होते. चौलच्या मयेकर आळीत त्यांची पंधरा गुंठ्यांची वाडी. ‘पंधरा गुंठ्यात पंचवीस माड आणि सत्तर सुपाऱ्या,’ त्यांनी हिशेब मांडला, ‘नारळाच्या झाडाला पंधरा वर्षानं फळ येतं आणि पुढली पन्नास वर्षे ते फळ देतं. सुपारीचं झाड पाच वर्षांनी बाजायला लागतं आणि पुढली पंधरा वर्षे फळत राहतं. झालेलं नुकसान एका वर्षात मोजायचं तरी कसं?

ग्रामपंचायतींनी खरेदी केली कटर्स : नेहमी वाडीतलं खासगी झाड तोडायचं असलं तरी येेथील शेतकऱ्यांना ग्रामपंचायतीची परवानगी करावी लागते. अर्ज-विनंत्या कराव्या लागतात. या वेळी आक्षीचे उपसरपंच राकेश म्हात्रे जातीने झाडं तोडणाऱ्या टीमचं नेतृत्व करत होते. वरच्या दोन आळ्यांमधल्या वाड्या साफ करून दिल्या, आता खालच्या आळीत कामं सुरू आहेत, ते सांगत होते. त्यासाठी त्यांच्या ग्रामपंचायतींच्या निधीतून दहा कटर्स खरेदी केलीत. पावसाळ्यापूर्वी नवीन लागवड करण्याच्या वेळी पडलेली झाडं तोडण्याचं काम करताना करावं लागल्याची उद्विग्नता त्यांच्या चेहऱ्यावरून लपत नव्हती.

रायगडमधील नारळ-सुपारीच्या वाड्या वा रत्नागिरीतील आंबा-काजूच्या बागा, कोकणातील संपूर्ण बागायती पट्टा लॉकडाऊन आणि निर्सग चक्रीवादळाच्या क्रूर चक्रात सापडल्याचे दृष्टीस पडते. पण, त्यावर शोक करत वेळ दवडण्यापेक्षा स्थानिक कोकणी माणूस आता पडझड बाजूला करून पुन्हा उभारी घेण्यासाठी कंबर कसत आहे.

दुप्पट भाव मिळणाऱ्या शहाळ्यांची माती
त्यांच्या वाडीत वादळात मोडलेल्या झाडांचा खच पडला होता. एकीकडे लॉकडाऊनपासून सुपारी व्यापारी फिरकला नाही, नारळ व्यापाऱ्यानं भाव पाडले. त्यात वादळानं झाडंच संपवून टाकली, एका प्रश्नाच्या उत्तराआधी अधिक कठीण प्रश्नात अडकावं अशी त्यांची अवस्था झाली. लॉकडाऊनमुळे बाहेर माल जाण बंद झालं आणि नारळ - सुपारीचे भाव कोसळले. पाहुणे, पर्यटक बंद झाल्याने स्थानिक बाजारातल्या मालाचाही खप आटला. उन्हाळ्याच्या सुटीत दुप्पट भावानं विकली जाणारी शहाळी माती बनून त्यांच्या वाडीत आडवी पसरली होती.

बातम्या आणखी आहेत...