आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपुरात एका 3 वर्षीय मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाली आहे.
तोंडात धरून फरपटत नेले
नागपूरच्या वाठोडा पोलिस स्टेशन हद्दीत अनमोल नगरमध्ये ही घटना घडल्याची माहिती आहे. निर्मनुष्य रस्त्यावर मुलगा खेळत असतानाच भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. अशरक्ष: तोंडात धरून कुत्र्यांनी त्याला काही अंतर फरपटत नेले. सुदैवाने मुलाच्या आईच्या हे लक्षात येताच तिने धावत-पळत येत कुत्र्यांना हाकलले व मुलाला खांद्यावर घेतले.
मुलगा गंभीर जखमी
या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला आहे. डुग्गु दुबे, असे जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. मात्र, या घटनेमुळे नागपुरातील भटक्या कुत्र्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
अधिक माहितीनुसार, नागपुरातील अनमोल नगरमध्ये काल डुग्गु हा मुलगा रस्त्याने पायी जात होता. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या रस्त्यावर नेहमी भटक्या कुत्र्यांचा घोळका असतो. या कुत्र्यांनीच मुलाला एकटे पाहून त्याच्यावर हल्ला केला. मुलाने आरडाओरड केल्याने त्याच्या आईचे लक्ष त्याच्याकडे गेले व पुढील दुर्घटना टळली. नंतर दुचाकीवरील एकजण धावतच मुलाकडे आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.
नागरिक संतप्त
दरम्यान, नागपूर शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा वावर आहे. तरीही त्यांच्या बंदोबस्तासाठी नागपूर महापालिकेकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. आता या घडलेल्या घटनेमुळे मुलाचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग येईल का?, असा सवाल नागरिक करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.