आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी माणसाला डिवचू नका, असे म्हणत राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना इशारा दिला आहे. मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. असे वक्तव्य कोश्यारी यांनी केले होते. त्यावर आता राज ठाकरेंनी तुम्हाला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलू नका म्हणत पत्र लिहित कोश्यारींचा खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
'आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहीत नसेल तर बोलत जाऊ नका. राज्यपाल हे एक प्रतिष्ठेचं आणि सन्मानाचं पद आहे म्हणून आपल्याविरूध्द बोलायला लोक कचरतात, परंतु आपल्या विधानांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या जातात. महाराष्ट्रात मराठी माणसानं येथील मन आणि जमीन मशागत करून ठेवल्यामुळेच तर इतर राज्यातील लोक येथे व्यवसाय करायला आले आणि येत आहेत ना? दुसरीकडे त्यांना असं वातावरण मिळेल का?
उगीच निवडणुकीच्या तोंडावर कुणी काही सांगितलं म्हणून बोलून वातावरण गढूळ करू नका. तुम्ही हे का बोलताय; हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे नाही. मराठी माणसाला डिवचू नका, इतकंच आत्ता आपल्याला सांगतो. जय महाराष्ट्र !
नेमके काय म्हणाले होते कोश्यारी?
भगतसिंह कोश्यारी हे शुक्रवारी मुंबईतील दाऊद बाग जंक्शन चौकाचे नामकरण व उद्घाटन सोहळ्यात म्हणाले, 'कधीकधी मी महाराष्ट्रात लोकांना सांगतो की, मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास तुमच्याकडे पैसेच शिल्लक राहणार नाहीत. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोक येथून गेल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटले जाणार नाही.' आता त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध सुरु झाला आहे.
नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये
राज ठाकरेंनी कोश्यारींच्या घेतलेल्या खरपूस समाचारानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही चांगलीच आक्रमक झाली आहे. नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, ही पहिली वॉर्निंग आहे, गुण्यागोविंदाने राहा, नको त्या गोष्टीत शहाणपणा करु नका, असा इशारा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यपाल कोश्यारींना दिला आहे. पुढे ते म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे. अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.
यांचा वरचा कोश रिकामा
मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी देखील ट्विट करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींवर टीका केली आहे ते म्हणाले, 'पुरे आता ...यांनी आता घरी बसावं ... मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये. नावात भगतसिंह इतकेच यांच कर्तृत्व. बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा. संतापजनक आणि निषेध, असे मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी टीका करताना म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.