आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईडीचे राजकारण:मुझसे मत लेना पंगा, मैं हूं नंगा, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला इशारा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मला भाजपच्या हस्तकांनी या ना त्या प्रकारे धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. या हस्तकांनी मला २२ आमदारांची एक यादी दाखवली असून या आमदारांना ईडीची नोटीस पाठवून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. दरम्यान, राऊत यांनी या वेळी अनेक हिंदी डायलॉग मारले. ते म्हणाले, “मुझसे मत लेना पंगा, मैं हूं आदमी नंगा’ असे म्हणत त्यांनी भाजपला जणू इशाराच दिला.

राऊत यांनी साेमवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, एका वर्षापासून भाजपचे हस्तक मला भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार टिकू देऊ नका. सरकारच्या मोहात पडू नका. आमची सरकार पाडण्याची तयारी झाली आहे, असे मला सांगून धमकावले जात आहे. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाइट करणार आहोत, असेही त्यांनी मला धमकावले. पण मीही त्यांचा बाप आहे. आमदार प्रताप सरनाईक हे त्याचे टोकन असून आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, आमची तयारी झाली आहे, असे या हस्तकांनी सांगितले. पण सरकार पाडण्यात ते अपयशी ठरले. त्यांची डेडलाइन नोव्हेंबरची होती. म्हणूनच सरकारचे खंदे समर्थक आणि सरकार बनवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे.

नोटीस जाणाऱ्या २२ आमदारांची भाजपच्या हस्तकांनी मला यादी दाखवली
मी तोंड उघडले तर तुमच्या सत्तेला हादरे बसतील

या वेळी राऊत यांनी मोदी केंद्र सरकारला इशारा दिला. मला तोंड उघडायला लावू नका. मी तोंड उघडले तर तुमच्या सत्तेला हादरे बसतील, असे ते म्हणाले. तुमचे उद्योग, तुमच्या मुलाबाळांचे हिशेब माझ्याकडे आहेत. पण कुटुंबापर्यंत जाण्याची आमची संस्कृती नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कुणाच्या कुटुंबापर्यंत न जाण्याचा सल्ला दिला आहे, असे स्पष्ट करत तुम्ही बायका-पोरांना यात आणत असाल तर तुमचे वस्त्रहरण करावेच लागेल. माझ्या पत्नीने तिच्या मैत्रिणीच्या मदतीने घर घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी ५० लाखांचे कर्ज घेतले होते. हे दहा वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. त्यासाठी नोटीस आली आहे.

भाजपचे नेते म्हणाले
१.
संजय राऊत शुद्ध कांगावा करत आहेत. राऊतांकडे १० नव्हे २४० आमदारांची यादी असेल तर त्यांनी ती ईडीला द्यावी. ईडीला ही यादी देऊन कारवाईची मागणी करावी, तोंडाची वाफ कशाला दवडता, असा सवाल भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला.
२. संजय राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण होती, अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली. राऊत यांनी जे सांगायचे ते थेट सांगावे आणि पुरावे देऊन मोकळे व्हावे. कर नसेल तर डर कशाला, असे भातखळकर म्हणाले.
३. गेल्या काही महिन्यांत ईडीकडून राऊत कुटुंबीयांना ३ नोटिसा आल्या आहेत. पण उत्तर एकालाही नाही, असे का? त्यांना उत्तर द्यावेच लागेल, असे ट्विट भाजप नेते किरीट सोमय्यांनी केले.

भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीची पिडा : अनिल देशमुख
नागपूर : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस पाठवली. तत्पूर्वी भाजपतून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांनाही ईडीची नोटीस पाठवली. भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडीची पिडा लावण्याचे घाणेरडे राजकारण सध्या राज्यात खेळले जात असल्याची टीका गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली.

ईडीच्या नोटिसीला अजिबात गांभीर्याने घेण्याची गरज नाही : प्रफुल्ल पटेल
भारतात अनेकांना ईडीची नोटीस येत असते. त्यात काही नवीन नाही. ईडीची नोटीस येणे खूप स्वस्त झाले असून आजकाल कुणालाही नोटीस बजावली जाते, असा टोला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. ईडीच्या नोटिसीमध्ये काहीच नवीन नाही. भारतात अनेकांना ईडीच्या नोटिसा येतात. ईडीची नोटीस येण्याचे कुणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कुणालाही नोटीस बजावली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो. ईडीच्या नोटिसीला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...