आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडूनच शिका, पवारांचा सल्ला:चिंता करू नका, भाजपला राज्यात पुन्हा येऊ देणार नाही, कामाला लागा, शरद पवारांची युवा आमदारांना सुचना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रविरूद्ध राज्य असा सामना सध्या रंगला असून अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला हादरे देत मी पुन्हा येणार असल्याचा इशारा गोवा निवडणूक विजयानंतर दिला. या सर्व धर्तीवर भाजपला राज्यात पुन्हा येऊ देणार नाही. तुम्ही कामाला लागा अन् त्यांच्याच नेत्यांच्या काही गोष्टी शिका असा सल्लाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या युवा आमदारांना दिला.

राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष शिगेला पोहचला. राजकारणातही डावपेच आखले जात आहेत. महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा असो की, भाजप नेत्यांवर महाराष्ट्र पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाया यातून संघर्ष चिघळत आहे. त्यातच महाविकास आघाडी सरकार पडणार असा दावा भाजप नेते सातत्याने करीत आहेत. पण या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक विधान करून मोठे आव्हान दिले आहे.

शरद पवार यांची महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी भेट घेतली. भाजपला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला पवारांनी तरुण आमदारांना दिला.

महाविकास आघाडीचे तरुण आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

आज देवेंद्र फडणीस यांचे नागपूरमध्ये जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी गोव्यानंतर आता महाराष्ट्रात जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर तरुण आमदारांनी शरद पवारांची घेतलेली भेट महत्त्वाची आहे.

शरद पवार यांचा त्यांच्या वाढत्या वयात असलेला आत्मविश्वास पाहून महाविकास आघाडीचे युवा आमदार अवाक झाले. पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर जवळपास दोन तास ही बैठक चालली. बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात वर करीत घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असा आत्मविश्वास व्यक्त केला.

आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून प्रत्येक भागातील प्रश्न, मुद्दे जाणून घेणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. युवा आमदार विधिमंडळ अधिवेशन कामकाजात कशा पद्धतीने सहभागी होतात, त्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या हे ही शरद पवार यांनी यावेळी चर्चेत जाणून घेतले.
भाजपकडून शिका!

भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या अनेक नकारात्मक गोष्टी असल्या, तरीही त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. दिवस-रात्र मेहनत घेण्याची तयारी, कामाचे मार्केटिंग, नियोजनबद्ध व्यूहरचना आखून निवडणूक लढण्याची तयारी या शिकण्यासारख्या गोष्टी असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...