आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ल्युकेमिया ब्लड कॅन्सर म्हणजे काय:प्रकाश आमटेंना झालेल्या आजाराची लक्षणे कोणती? तज्ज्ञ काय म्हणतात हे जाणून घेऊया

मयुरी वाशिंबे |औरंगाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅन्सर अर्थात कर्करोग हा एक अतिशय गंभीर आजार आहे. यामुळे दरवर्षी हजारोंचा बळी जातो. हा आजार एखाद्याला कधी व केव्हा गाठेल हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे या आजाराविषयी जनसामान्यांच्या मनात एक वेगळीच भीती असते. कॅन्सरवर आतापर्यंत अनेक संशोधने झाली. पण, रामबाण उपाय अजून सापडला नाही. असे असले तरी हा दुर्धर आजार नियंत्रणात ठेवता येईल अशी अनेक औषधी आज बाजारात उपलब्ध आहेत.

कँसर म्हटले की आपल्या डोळ्यापुढे त्वचा, फुफ्फुस, स्तन व स्वादुपिंडाच्या कँसरचे रुग्ण डोळ्यापुढे येतात. पण, ल्युकेमिया हा देखील एक कर्करोगाचा प्रकार आहे. हा त्याच्या इतर भावांपेक्षा थोडा जास्त खोडकर म्हणजे गंभीर आहे. त्याला रक्ताचा कर्करोग किंवा ब्लड कॅन्सर म्हणूनही ओळखले जाते. या आजाराच्या पेशींभोवती केसांसारखे एक आवरण असते. त्यामुळे त्याला हेअरी सेल ल्युकेमिया अर्थात केसाळ पेशी ल्युकेमियाही म्हटले जाते. या आजाराने आता ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटेंना गाठले आहे. त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

त्यामुळे आम्ही तुम्हाला याठिकाणी हेअरी सेल ल्युकेमिया म्हणजे काय? तो कशामुळे होतो? तज्ज्ञ याविषयी काय म्हणतात? या आजारावरील उपचार कोणते? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा तुम्हाला फायदा होईल.

ल्युकेमियाचे दोन प्रकार असतात. अक्युट आणि क्रोनिक. हेअरी सेल ल्युकेमिया कॅन्सर हा क्रोनिक या प्रकारात मोडतो. म्हणजे हा रक्त आणि अस्थिमज्जाचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. यात तुमच्या बी पेशी (लिम्फोसाइट्स)वर परिणाम करतो. एरव्ही या पांढऱ्या पेशी म्हणजे सैनिक पेशी शरीरातील रोगजंतुशी लढतात. पण, हेअरी सेल ल्युकेमिया झाल्यानंतर तुमचे शरीर असामान्य बी लिम्फोसाइट्सचे अतिरिक्त उत्पादन करते आणि या पेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत. या असामान्य पेशी निरोगी बी लिम्फोसाइट्सची जागा घेतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि तुम्हाला इतर संक्रमण होण्याची शक्यता असते. म्हणजे अतिरिक्त निर्मितीमुळे रोग प्रतिकारक यंत्रणेत या पेशी तारक ऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसतात. म्हणून त्यांना हेअरी सेल ल्युकेमिया म्हटले जाते.

काही लोकांमध्ये हेअरी सेल ल्युकेमियाची कोणतीही चिन्हे किंवा लक्षणे नसतात. परंतु दुसर्‍या एखाद्या आजारासाठी रक्त तपासणी केल्यानंतर अनवधानाने हेअरी सेल ल्युकेमियाचे निदान होते. कर्करोग तज्ञ डॉ दर्पण जक्कल यांनी सांगितले की, अनेकदा आमच्याकडे पोटात गोळा आल्यासारखे होत आहे, असे रुग्ण सांगतात. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना हेअरी सेल ल्युकेमिया कॅन्सर असल्याचे निदान होते. या कॅन्सरचे निदान होणारे जवळपास 25 टक्के लोक हे आम्हाला पोटात गोळा आल्याचे कारण सांगतात. हा कॅन्सर झाल्यानंतर बरगडीच्या खाली अगदी छोटीशी असलेली प्लीहा (ओटीपोटाच्या डाव्या बाजूला एक अंडाकृती-आकाराचा अवयव) ही दोन ते तीन पट आकाराने वाढते. आशावेळी याशिवाय, रुग्णाला पोटात गाठ आल्यासारखे आणि पोट फुगल्यासारखे वाटते. तसेच पोटात लिव्हरवर सूज येते.

कर्करोग तज्ञ डॉ दर्पण जक्कल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हेअरी सेल ल्युकेमियाचा धोका हा साधारणपणे 60 ते 70 वयवर्ष असलेल्यांना जास्त असतो. तसेच आशियन लोकांपेक्षा अमेरिकन आणि युरोपीय लोकांमध्ये हा हेअरी सेल ल्युकेमिया मोठ्या प्रमाणात आढळतो. सगळ्या कॅन्सरच्या प्रकारात हा रिअर प्रकार आहे. जास्तीत जास्त 2 टक्के असे याचे प्रमाण आहे. याशिवाय, हेअरी सेल ल्युकेमिया हा कॅन्सर महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळून येतो. हेअरी सेल ल्युकेमिया हा एक जुनाट आजार मानला जातो. कारण, तो कधीही पूर्णपणे नाहीसा होऊ शकत नाही. मात्र, उपचारांद्वारे रुग्ण जास्तीत जास्त काळ जिवंत राहू शकतो. कधीकधी हा कॅन्सर उपचारांना प्रतिसाद देत नाही आणि उपचारानंतर पुन्हा परत होतो.

हेअरी सेल ल्युकेमिया कॅन्सर हळुहळु शरीरात पसरतो. त्यामुळे या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर लवकर उपचार घ्यावेत. या रुग्णावर केमोथेरपी केल्यास रुग्ण वाचण्याचे प्रमाण जास्त असते. यात जर टार्गेटेड कीमोथेरेपी घेतली तर त्याचा जास्त चांगला प्रभाव पडतो. या थेरपीमध्ये औषधे गथेट कर्करोगाच्या पेशींवर परिणाम करतात आणि त्यांना निष्क्रिय करतात. टार्गेटेड कीमोथेरेपीने कर्करोगाच्या पेशी स्वतंत्रपणे शोधल्या जाऊ शकतात. यामुळे निरोगी पेशींना कोणतेही नुकसान होत नाही. सुरक्षित मार्गाने कर्करोगाच्या पेशींना नष्ट केले जाऊ शकते. पण, ही केमोथेरपी ही जास्त खर्चिक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, टार्गेटेड कीमोथेरेपीने शरीरावर इतर साईड इफेक्ट होत नाहीत. त्यामुळे हेअरी सेल ल्युकेमिया कॅन्सर असलेल्या रुग्णांनी टार्गेटेड कीमोथेरेपी घ्यावी, असा सल्ला डॉक्टर देतात.

का होतो हा कॅन्सर?
हेअरी सेल ल्युकेमिया कॅन्सर होण्याचे ठोस कारण अद्याप माहिती नाही. पण, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या किटकनाशकापासून हा कॅन्सर होऊ शकतो, असे एका फ्रान्सच्या अभ्यासातून समोर आले आहे. रेडिएशनच्या संपर्कात आलेल्या लोकांना ल्युकेमिया होण्याचा धोका जास्त असू शकतो.

कोणत्या चाचण्यांनी निदान होते?
बोन मॅरो बायोप्सी चाचणी केली जाते.
प्लीहाचा आकार तपासला जातो.
संपूर्ण रक्त गणना (CBC)
सीटी स्कॅन केले जाते.

इतर कॅन्सरचा धोका वाढतो
काही अभ्यासात असे आढळून आले आहे, की केसाळ पेशी ल्युकेमिया असलेल्या लोकांना दुसऱ्या प्रकारचा कर्करोग होण्याचा धोका वाढू शकतो. हा धोका केसाळ पेशी ल्युकेमियामुळे शरीरावर होणाऱ्या परिणामामुळे होतो.

  • सांधे दुखी

हे ब्लड कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण आहे, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. यामध्ये सांध्यांमध्ये कधी तीक्ष्ण, तर कधी हळूहळू वेदना होतात. या वेदनांचे मुख्य कारण म्हणजे असामान्य पांढऱ्या रक्त पेशी. हे दुखणे पाय आणि हातामध्ये जास्त असते. हीदेखील ल्युकेमियाची लक्षणे आहेत.

  • डोकेदुखी

हे एक सामान्य लक्षण आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. जर बऱ्याच काळापासून डोकेदुखी असेल तर ते रक्ताच्या कर्करोगाचे लक्षणदेखील असू शकते. जेव्हा रक्ताचा कर्करोग होतो तेव्हा चेहरा फिकट होतो.

  • थकवा

ल्युकेमियाने ग्रस्त व्यक्ती खूप लवकर थकते किंवा त्याचे शरीर त्याला साथ देत नाही. अशी व्यक्ती शरीराने कोणतेही काम करण्यास असमर्थ ठरते.

  • ताप आणि संसर्ग आणि वजन कमी होणे

ल्युकेमियामुळे शरीराचे तापमानदेखील असामान्य होते, ज्यामुळे ताप आणि संसर्ग होण्याचा धोका वाढतो. तापामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील कमकुवत होते, ज्यामुळे इतर अनेक आजार होतात. वजन असामान्य पद्धतीने कमी होऊ लागते.

  • धाप लागणे

ल्युकेमिया रक्ताभिसरणात व्यत्यय आणतो, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते आणि नंतर श्वास घेण्यास त्रास होतो. रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्यांना श्वास कोंडण्याची समस्या असते. ओटीपोटात सूज आणि वेदना हे रक्ताच्या कर्करोगाचे एक सामान्य लक्षण आहे, ज्यामध्ये प्लीहा आणि यकृत फुगणे सुरू होते. अशी सूज आल्याने पोटात दुखू लागते. तसेच पोट नेहमी भरलेले असल्याचे वाटायला लागते.

  • त्वचेवर लहान ठिपके

हे लहान ठिपके petechiae म्हणून ओळखले जातात, जे लालसर रंगाचे असतात आणि ते हात, पाठ, छाती तसेच चेहऱ्यावर आढळतात. ल्युकेमियामुळे प्लेटलेट्समध्ये झपाट्याने घट होते. दुसरीकडे, प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे शरीरात ठिपके सुरू होतात, जे लवकर लक्षात येत नाहीत.

तर कॅन्सरपासून आपला बचाव करण्यासाठी आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याच्या या सवयी बदलाव्यात. कारण, पौष्टिक आहार केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. आरोग्य चांगले राहण्यासाठी सातत्याने सकाळी योग व प्राणायाम करत जा. यामुळे शरीर मजबूत होईल. निरोगी शरीर हाच खरा दागिना असून आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...