आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज प्रकरण:आर्यनसोबत सेल्फी घेणारा डिटेक्टिव्ह, अरबाजला घेऊन जाणारा भाजप नेता,  राष्ट्रवादीच्या आरोपांमुळे नवा वाद

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रूझवरील कारवाई बोगस; राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मुंबईत एनसीबीने ३ ऑक्टोबर रोजी मुंबई-गोवा क्रूझवर कारवाई करून काही लोकांना अटक केली होती. ही कारवाईच बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यामध्ये बॉलीवूडचा स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर काहींना अटक करण्यात आली. मात्र आर्यन खानला अटक करताना ज्या व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला आहे ती किरण पी. गोसावी नावाची व्यक्ती खासगी डिटेक्टिव्ह असून एनसीबीचा अधिकारी नसल्याची बाब खुद्द एनसीबीने सांगितली आहे. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनीष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असून तोही एनसीबीचा अधिकारी नसल्याचे समोर आले आहे. मग या दोघांनी कोणत्या अधिकारात अटक केली, असा आरोप राष्ट्रवादीचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी केला.

३ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राइम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के. पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करुन के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के.पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेटस ठेवतो. के.पी.गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे अशी मागणीही मलिक यांनी केली. तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.

बॉलीवूडला बदनाम करण्याचा डाव : सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरही एनसीबी चर्चेत आले होते. त्या वेळीही बॉलीवूडला बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न झाले. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पद्धतशीरपणे लावण्यात आले. सेलिब्रिटींना त्यात दाखवून बॉलीवूड कसे नशेच्या आहारी गेले आहे हे दाखवण्यात आले. आताही आर्यन खान प्रकरणात असाच प्रकार सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला.

मलिकांच्या पोटात का दुखते?

एनसीबीच्या कारवाईवर मंत्री नवाब मलिक यांच्या पोटात का दुखते? असे सवाल करुन मलिक यांच्या जावयावर एनसीबीने ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी कारवाई केली होती, याकडे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

गोसावी, भानुशाली स्वतंत्र साक्षीदार : एनसीबीचे स्पष्टीकरण
राष्ट्रवादीचे प्रवक्ते मलिक यांनी केलेले आरोप एनसीबीने फेटाळले. एनसीबीने नियमानुसार कारवाई केली आहे. या कारवाईत के. पी. गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्यासह अन्य व्यक्तींची स्वतंत्र साक्षीदार म्हणून मदत घेण्यात आली. त्यामुळे एनसीबीवरील आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन असल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत केला.

हे आहेत साक्षीदार : प्रभाकर सेल, किरण गोसावी, मनीष भानुशाली, ऑब्रे गोमेझ, आदिल उस्मानी, व्ही.वायंगणकर, अपर्णा राणे, प्रकाश बहादूर, शोएब फैज, मुहंमद इब्राहिम.

व्हिडिओत कसे काय दिसतो माहिती नाही : भानुशाली
आपण भाजपचे सामान्य कार्यकर्ते आहोत. मला त्या क्रूझवरच्या पार्टीत अमली पदार्थाचा वापर होणार असल्याची माहिती एका निनावी फोनद्वारे मिळाली होती, आपण क्रूझवर कुणालाच अटक केली नाही. मात्र त्या व्हिडिओत कसे काय दिसतो, हे आपल्याला माहिती नाही, असा दावा मनीष भानुशाली याने केला. भानुशाली हा मुलुंडचा रहिवासी आहे.

बातम्या आणखी आहेत...