आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:देवेंद्र फडणवीसांशी मैत्रीमुळे धनंजय मुंडेंवर भाजपचे तळ्यात-मळ्यात

मुंबई8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजांना फडणवीसांचा विरोध हाच प्रमुख धागा

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप होताच स्वपक्ष राष्ट्रवादीने गंभीर दखल घेतली. मात्र विरोधक भाजपने नेहमीप्रमाणे आक्रमकपणे हा मुद्दा लावून धरला नव्हता. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील मैत्री त्यामागची मेख असून या मैत्रीमुळेच भाजपचे धोरण मवाळ असल्याचे सांगितले जाते.

मुंडे यांनी बुधवारी रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपावर खुलासा केला. त्यावर विरोधी पक्षनेते व भाजपचे राज्यातील सर्वेसर्वा देवेंद्र फडणवीस यांनी ‘प्रथम सत्य पुढे येऊ द्या, मग आम्ही भूमिका मांडू’ अशी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली. फडणवीस हे ठासून आरोप करण्यात, ते पटवून देण्यात माहिर आहेत. आक्रमक नेते अशी फडणवीस यांची ओळख आहे. पण, मुंडे प्रकरणी फडणवीस तसे दिसले नाहीत. भाजपतून मुंडे यांच्यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरीट सोमय्या या तिघांनीच आरोप केले. हे तिघे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी गटाचे आहेत. त्यामुळेच या तिघांनी ठरवून फडणवीस यांच्या विरोधी भूमिका घेत मुंडे यांच्यावर निशाणा साधला. परिणामी फडणवीस हे पक्षात एकटे पडल्याचे दिसून आले.

मुंडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असताना फडणवीस मुख्यमंत्री होते. परंतु, मुंडे यांनी पाच वर्षात फडणवीस यांच्यावर एकदाही गंभीर आरोप केले नाहीत. अजित पवार यांच्याबरोबर फडणवीस यांनी ८० तासांचे सरकार स्थापन केले. त्यात धनंजय मुंडे यांनी फडणवीस यांना मदत केल्याचे आरोप झाले हाेते.

फडणवीस समर्थक हेगडे : धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा हनी ट्रॅप लावते, असे आरोप करणारे कृष्णा हेगडे हे भाजपचे नेते आहेत. विशेष म्हणजे हेगडे यांना फडणवीस यांनी काँग्रेसमधून आयात केले आहे. मनसेच्या मनीष धुरी या नेत्याने रेणू शर्मावर आरोप केले. मनसे सध्या भाजपच्या तालावर नाचते आहे. हेगडे अन् धुरी यांच्या रेणू शर्मावरील आरोपांमुळे मुंडे यांच्यावरील आरोपांची तीव्रता कमी झाली. म्हणजे मुंडे यांना फडणवीस यांच्याबरोबरची मैत्री पथ्यावर पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

पंकजांना फडणवीसांचा विरोध हाच प्रमुख धागा
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांना राजकारणातील आपली स्पर्धक मानतात. मुख्यमंत्रिपदाच्या काळात फडणवीस यांनी पंकजा यांचे प्रत्येक टप्प्यावर खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. पंकजा यांचा पक्षात वरचष्मा होऊ नये यासाठी फडणवीस हे धनंजय मुंडे यांना सातत्याने मदत करत आले. २०१९ च्या परळी विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या विरोधात जाऊन भाजपने राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना मदत केल्याचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...