आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविधान परिषद निवडणुकीसाठी चार पक्ष मतांचे गणित कसे जुळवतात याकडे लक्ष लागलेले असताना आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोड्या सुरू झाल्या आहेत. शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी फोन केल्याने मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेकडे असलेल्या ५५ मतांमुळे शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांचा विजय निश्चित मानला जातो. राष्ट्रवादीचे उमेदवार रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे सहयोगी अपक्ष आमदारांच्या बळावर विजयी होतील. मात्र क्रॉस व्होटिंगचा फटका बसू नये यासाठी राष्ट्रवादीकडून सावधगिरी घेतली जात आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतील मतदान प्रक्रियेविषयी आमदारांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार आदेशानुसार मतदान करतील. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास परिवहनमंत्री अनिल परब यांनी या बैठकीनंतर व्यक्त केला.
शिवसेनेचे आमदार रेनिसन्सवर : विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेचे आमदार आज मुंबईत दाखल झाले. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार पवई येथील रेनिसन्स हॉटेलवर रवाना झाले. याविषयी अनिल परब यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, सर्व आमदार एकत्र असल्यावर त्यांना मतदानाविषयी माहिती देणे अधिक सोयीस्कर असते.
अनिल देशमुख, मलिकांना परवानगी नाही
राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना न्यायालयाने मतदानाची परवानगी न दिल्याने राष्ट्रवादीला धक्का बसला आहे. यामुळे मतदार करणार्या आमदारांची संख्या २८५ वर आली असून प्रत्येक उमेदवाराला विजयासाठी मतांचा कोटा २६.२० वर आला आहे. शुक्रवारी फोनाफोनी तसेच प्रत्यक्ष भेटून मतांची बेगमी करण्याचे उमेदवारांचे प्रयत्न चालू होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.