आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाच्या युवासेना सचिव अॅड. दुर्गा भोसले-शिंदे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. दुर्गा भोसले-शिंदे या काल ठाण्यातील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघलेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चामध्येच अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, मध्यरात्रीच त्यांच्या निधनाचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मन सुन्न झाले- आदित्य ठाकरे
ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनीदेखील दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मन सुन्न झाले असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करुन दुर्गा भोसले-शिंदे यांच्या निधनाबद्द्ल शोक व्यक्त केला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही आज गमावला आहे. युवासेना परिवाराला झालेला शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ओम शांती.
दुर्गा भोसले-शिंदे यांनी वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील केशवराव भोसले आणि भाऊ असा परिवार आहे.
मोर्चात घोषणाही दिल्या
दुर्गा भोसले-शिंदे यांची युवासेनेची रणरागिणी म्हणून मुंबई, ठाण्यात ओळख होती. त्या काल आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात ठाण्यात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात सहभागी झाल्या होत्या. मोर्चा सुरु असताना सहकारी शिवसैनिकांसोबत त्यांनी उत्स्फूर्तपणे घोषणाही दिल्या. मात्र, चालत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने दुर्गा भोसले-शिंदे यांना उपचारांसाठी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच मध्यरात्री त्यांचे निधन झाले.
आज संध्याकाळी अंत्ययात्रा
युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचे निधन झाल्याचे समजल्यानंतर युवासेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सर्वांनाचा मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील राहत्या घरातून आज संध्याकाळी सहा वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर बाणगंगा स्मशानभूमी, वाळकेश्वर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
हेही वाचा,
प्रत्युत्तर:आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख, सोन्याच्या चमचा घेऊन आलेल्यांना काय बोलणार?- एकनाथ शिंदे
आदित्य ठाकरेंचा जन्मही झाला नव्हता तेव्हापासून मी शाखाप्रमुख म्हणून काम करतोय. सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेल्यांना आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्यांना मी काय बोलणार? असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.