आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोसरी भूखंड घोटाळा:राष्ट्रवादीचे नेते खडसेंना ईडीचे समन्स; जावयास अटक; जा‌वई गिरीश चौधरींचे चौकशीत असहकार्य, पहाटे घेतले ताब्यात

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खडसेंनी दोन वेळा टाळले, आज पुन्हा चौकशी

पुणे एमअायडीसी भूखंड घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चाैधरी यांना बुधवारी पहाटे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी ) अटक केली. सन २०१६ मधील हे प्रकरण अाहे. या घोटाळ्यामुळेच फडणवीस सरकारच्या कार्यकाळात एकनाथ खडसेंना महसूलमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. बाजारभावाच्या तुलनेत कवडीमोल किमतीत भूखंड लाटल्यामुळे राज्य सरकारला ६१ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अारोप ईडीने ठेवला आहे.

अवैध व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) गिरीश चाैधरींना अटक करण्यात आली असून, त्यांना बुधवारी विशेष न्यायालयात हजर केले असता सोमवार, १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. चौधरी यांची मंगळवारी प्रदीर्घ चौकशी करण्यात आली. या चौकशीस ते सहकार्य करीत नव्हते. त्यामुळे त्यांना बुधवारी पहाटे अटक करण्यात अाली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

महसूलमंत्रिपदाचा गैरवापर, खडसेंकडून इन्कार
भूखंडाचा व्यवहार झाला त्या वेळी एकनाथ खडसे महसूलमंत्रिपदावर होते. त्यांनी अापल्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका अाहे. खडसेंनी हा अारोप फेटाळला होता. तसेच या प्रकरणी अायकर खाते अाणि एसीबीने क्लीन चिट दिल्याचा दावाही केला अाहे. हा घोटाळा चव्हाट््यावर अाल्यानंतर खडसेंना फडणवीस मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा लागला होता.

पुणेस्थित उद्योगपतीच्या तक्रारीनंतर घोटाळा चव्हाट्यावर
एमअायडीसीचा ४० कोटी बाजारमूल्याचा भूखंड एकनाथ खडसे अापल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून अत्यंत कवडीमोल भावात (३.७५ कोटी) अापल्या नातेवाइकांच्या नावाने खरेदी केल्याची तक्रार पुणेस्थित उद्योगपती हेमंत गावंडे यांनी सन २०१६ मध्ये बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अाधारे एसीबीने खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अाणि जावई गिरीश चाैधरी अाणि मूळ भूखंड मालक अब्बास उक्कानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सन २०१८ मध्ये एसीबीने पुणे न्यायालयात या प्रकरणी २२ पानी अहवालही सादर केला होता.

खडसेंनी दोन वेळा टाळले, आज पुन्हा चौकशी
खडसे यांची जानेवारी महिन्यात ईडीने चाैकशी केली होती. गुरुवारी अाता खडसे अापली बाजू मांडणार अाहेत. यापूर्वी कोरोनाचे कारण पुढे करीत त्यांनी दाेन वेळा ईडी चाैकशीला जाण्याचे टाळले होते.

खरेदीमुळे शासनाला ६१ कोटींचा फटका
पुणे जिल्ह्यात भोसरी तालुक्यातील हवेली गावातील एमआयडीचा सर्व्हे. ५२-२ए-२ हा भूखंड बाजारभावापेक्षा स्वस्तात खरेदी केल्याचा अारोप अाहे. या प्रकरणात एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चाैधरी यांच्याविरोधात सन २०१७ मध्ये पुणे लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) खात्याने गुन्हा दाखल केला होता. या खरेदीमुळे शासनाचे ६१ कोटी २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अारोप अाहे.

३१ कोटी बाजारमूल्य, ३.७५ कोटीने खरेदी
अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या भूखंडाचे बाजारमूल्य ३१ कोटी रुपये असताना त्याची ३ कोटी ७५ लाख रुपयांची रजिस्ट्री झाली होती. गिरीश चाैधरी यांनी इतरांच्या साथीने हा एमअायडीचा भूखंड प्रत्यक्ष किमतीपेक्षा अडीच ते तीनपट स्वस्तात खरेदी केला. ही खरेदी करण्यासाठी चाैधरी यांनी काही कंपन्यांकडून कर्ज घेतल्याचे दाखवले. प्रत्यक्षात या कंपन्याच अस्तित्वात नव्हत्या अथवा शासकीय दप्तरात त्या बंद पडल्याची नोंद होती.

बातम्या आणखी आहेत...