आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे टार्गेट:अनिल परब, हजर व्हा! शंभर कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी ईडीची परब यांना नोटीस; वकिलाशी चर्चा करून नोटिसीला उत्तर देईन- परब

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे तर गलिच्छ राजकारण : खा. अरविंद सावंत

राज्याचे परिवहनमंत्री, शिवसेनेचे नेते आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी मुंबई कार्यालयात शंभर कोटी वसुलीसंदर्भातील चौकशीला हजर राहण्याबाबत नोटीस पाठवली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समाजमाध्यमावर या नोटिसीची माहिती रविवारी दिली. मात्र नोटीस कशासंदर्भात आहे, हे स्पष्ट होत नसल्याने परब हजर राहणार नसल्याचे समजते. एकूण पाहता महाविकास आघाडी आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष उत्तरोत्तर पेटत चालला असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राणे यांना कोकणात अटक केल्यानंतर आकसाने परब यांना नोटीस बजावण्यात आल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच याप्रकरणी सेना कायदेशीर लढाई कायद्यानेच लढेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत : राऊत
मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस धाडल्यानंतर संजय राऊत यांनी “शाब्बास’ अशी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केली. जनआशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली. वरचे सरकार कामाला लागले. भूकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परिवहनमंत्री अनिल परब हे रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, असे सांगत कृपया क्रम समजून घ्या, असे राऊत यांनी म्हटले आहे.

राजीनामा घेणार?
परब यांना ईडीची नोटीस आल्याने शिवसैनिकांत त्यांच्याविषयी सहानुभूती आहे. शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश पाळल्यामुळे आणि नारायण राणे यांच्या अटकेचे आदेश दिल्यामुळे परब यांना नोटीस आल्याचे शिवसैनिकांना वाटते. मात्र अनिल देशमुख यांच्याप्रमाणे परब यांना राजीनामा द्यावा लागणार नाही, असे सेना नेत्यांचे म्हणणे अाहे.

हे तर गलिच्छ राजकारण : खा. अरविंद सावंत
ईडीने आता परब यांनाही नोटीस बजावणे हे अगदी खालच्या स्तरावरील गलिच्छ राजकारण आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खा. अरविंद सावंत यांनी दिली. मला यांची कीव येते, असे सांगून भाजप नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का, असा सवाल सावंत यांनी केला. महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचे हे काम असल्याचे सावंत म्हणाले.

परब यांच्यावर आरोप काय
मुंबईतील भेंडी बाजार येथील सैफी बुऱ्हाणी ट्रस्टकडून ५० कोटी आणि मुंबई पालिकेतील ५० कंत्राटदारांकडून प्रत्येकी २ कोटी रुपये वसुलीचे आदेश अनिल परब यांनी दिले होते, असे पत्र अँिटलिया स्फोटप्रकरणी अटकेत असलेला निलंबित पोलिस उपनिरीक्षक सचिन वाझे याने लिहिलेले आहे. आश्चर्य म्हणजे ते पत्र एनआयए न्यायालयाने दाखल करून घेण्यास नकार दिला होता. नंतर ते प्रसिद्धिमाध्यमांकडे गेले.

गैरहजर राहणार
ईडीने पाठवलेली नोटीस नेमक्या कोणत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी आहे, याची नोटिसीत स्पष्टता नाही. यासंदर्भात सोमवारी आमची बैठक आहे. त्यात ईडीसमोर हजर होण्याबाबत निर्णय होईल. शक्यतो अनिल देशमुख यांच्याप्रमाणे परब यांचा वकीलच चौकशीत हजर राहील, अशी माहिती सेनेच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

आता पुढील नंबर कुणाचा?
केंद्र आणि राज्य सरकारमधील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर ईडी कारवाया करत असल्याचा आरोप राज्यातील सत्ताधारी गोटातून सातत्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुढील नंबर कुणाचा, अशीही जोरदार चर्चा असून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख करत तसे संकेत दिले आहेत.

वकिलाशी चर्चा करून नोटिसीला उत्तर देईन...
रविवारी संध्याकाळी ईडीकडून नोटीस मिळाली. पण ही नोटीस नेमकी कशासाठी आहे, हे समजत नाही. वकील-तज्ज्ञ समितीसोबत चर्चा करून उत्तर देईन. हा प्रकार सूडबुद्धीने केला आहे का, यावर मला आताच बोलायचे नाही, मला आलेल्या नोटिसीला कायदेशीर उत्तर देईन, असे परब म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...