आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात ईडी पुन्हा अॅक्शन मोडमध्ये आले आहे. ईडीने पुणे आणि मुंबईत पुन्हा एकदा कारवाई सत्र सुरू केले आहे. शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना ज्या प्रकरणात तुरुंगवास भोगावा लागला त्या पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणात सोमवारी ईडीने कन्स्ट्रक्शन कंपनीच्या दोन संचालकांची संपत्ती जप्त केली आहे. तर माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने पुण्यात ९ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.
पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणातील गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि.चे नॉर्थ गोव्यातील संचालक राकेशकुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणत ३१.५० कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती जप्त केल्या आहेत. पत्राचाळ कथित घोटाळ्यात संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांना विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. राऊत यांची अटक बेकायदेशीर होती, असे कोर्टाने जामीन मंजूर करताना म्हटले होते. मात्र, प्रमुख आरोपी राकेश वाधवान आणि सारंग वाधवान यांना अटक का केली नाही? असा सवालही कोर्टाने विचारला होता. साक्षीदारांच्या जबाबातून वाधवान यांचा सहभाग उघड होतो, असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले होते.
पुण्यात व्यावसायिकांच्या घर, कार्यालयांवर छापे
पुणे येथे हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित पुण्यातील व्यावसायिकांच्या घरी ईडीने छापे मारले. व्यावसायिक विवेक गव्हाणे, सीए जयेश दुधेडीया आणि वादग्रस्त ब्रिक्स कंपनीचे संचालक चंद्रकांत गायकवाड यांच्यावर ईडीने छापेमारी केली आहे. पुणे शहरातील सॉलसबारी पार्क,गणेश पेठ, हडपसर, प्रभात रोड, सिंहगड रोडसह इतर ठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे.
कडेकोट सुरक्षेत ईडीच्या पथकांनी केली छापेमारी
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुरेसा पोलिस बंदोबस्त ईडी अधिकाऱ्यांनी सोबत ठेवला आहे. ईडी छापेमारी करत असलेल्या ठिकाणी इतरांना प्रतिबंध आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात व्यावसायिकांशी नेमके कोणत्या प्रकारचे आर्थिक व्यवहार झाले, त्याची कोणती कागदपत्रे आहेत, त्याबाबत कोणते पुरावे मिळू शकतात का, याबाबतची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.