आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढचा नंबर परबांचा?:शिंदे गटात गेलेल्या प्रताप सरनाईक, भावना गवळी, अर्जुन खोतकर, जाधव यांच्यावर ईडी कारवाई करणार का?

अनिल जमधडे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेची बुलंद तोफ, खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर शिवसेना हा पक्ष लवकरच संपणार असल्याचे वक्तव्य केले आहे. शिवसेनेचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपकडून पूर्ण प्रयत्न केले जात असताना आता राऊत यांच्यानंतर उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू, माजी मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीच्या कारवाईचा फास आवळणार का?, अशी चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, शिंदे गटात गेलेल्या अनेक आमदार, खासदार, नेत्यांवरही ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. मात्र, शिंदे गट आता भाजपसोबत गेल्याने ईडी त्यांच्यावर कारवाई करणार का?, असादेखील प्रश्न निर्माण झाला आहे. माजी मंत्री अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, आमदार भावना गवळी, मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांना कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी ईडीने समन्स बजावले आहेत. मात्र, हे सर्व नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून आता भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. यापैकी अर्जुन खोतकर यांनी तर 'सेफ होण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात', असे म्हणत ईडीच्या कारवाईमुळेच शिंदे गटात जात असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत असताना अडचणीत आलेले हे नेते आता 'सेफ' झाले आहेत का? असाही प्रश्न विचारला जात आहे.

संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर आता पुढचा नंबर उद्धव ठाकरेंचे विश्वासू अनिल परब यांचा आहे का? तसेच, शिंदे गटात गेलेल्या आमदार, खासदारांवर ईडीकडून आताही कारवाई केली जाईल की त्यांच्यावरील कारवाईचा फास सैल केला जाईल, यावर हे विशेष एक्सप्लेनर...

अनिल परब - आतापर्यंत ईडीकडून चारदा चौकशी

रत्नागिरीतील दापोली येथील अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे. पर्यावरणाचे उल्लंघन करुन या रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आले, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केला होता. त्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने स्थानिक प्रशासनाला हे रिसॉर्ट तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, तेव्हा राज्यात मविआ सत्तेत असल्यामुळे रिसॉर्टवरील कारवाई टळली. त्यानंतर या रिसॉर्टच्या व्यवहारात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत ईडीने परबांना चारदा समन्स बजावले. चारही वेळेस ईडीसमोर हजर राहत परब चौकशीस सामोरे गेले. अनिल परब यांच्या निवासस्थानीही ईडी अधिकाऱ्यांनी झाडाझडती घेतली होती. तेव्हाच अनिल परब यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, परब यांना अटक झाली नाही. मात्र, या कारवाईनंतर सतत सक्रिय असणारे अनिल परब माध्यमांसमोर फारसे आले नाहीत. आतादेखील अनिल परब हे शिंदे गट तसेच भाजपवर टीका करताना दिसत नसले तरी ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने शिंदे गटात जातील, अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे पूर्ण खच्चीकरण करण्यासाठी राऊत यांच्यानंतर आता अनिल परबांविरोधात कारवाईचा फास आवळला जाण्याची शक्यता आहे.

अर्जुन खोतकर - कुटुंबाची चिंता म्हणून शिंदेंसोबत

‘गेल्या 40 वर्षांपासून मी सच्चा शिवसैनिक आहे, परंतु सध्या मी आणि माझे कुटुंब ज्या परिस्थितीतून जात आहे ते मी पाहू शकत नाही. घरी आलो की मला चिंतेत असलेले कुटुंब दिसते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला,’ अशा शब्दांत माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली होती.

जालना सहकारी साखर कारखाना विक्री व खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप सोमय्यांनीच खोतकर यांच्यावर केला होता. जवळपास 75 कोटींचे मुल्य असणारा कारखाना खोतकर यांनीच नंतर 44 कोटीत खरेदी केला, असा आरोप करत ईडीने खोतकर यांना समन्स बजावले होते. विशेष म्हणजे खोतकर यांच्या कुटुंबीयांचीही या कारखान्यात भागीदारी असल्याने हे कुटुंबीयदेखील अडचणीत येण्याची शक्यता होती. त्यामुळे 'मी आता सहारा शोधला आहे. माझा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा आहे, अशी घोषणा खोतकरांनी केली होती.

प्रताप सरनाईक - ईडीकडून 2 सदनिका जप्त

नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमध्ये गुंतवणूकदारांची 5,600 कोटी रुपयांच्या फसवणूक केल्याप्रकरणी ईडीने प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यात ठाणे येथील दोन सदनिका आणि एका जमिनीचा समावेश आहे. प्रतास सरनाईक यांच्यावर ईडीने ही कारवाई करताच सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची साथ सोडून पुन्हा भाजपसोबत जावे, अशी मागणी त्यांनी केली होती. सरनाईक यांच्या पत्राची चांगलीच चर्चा झाली होती. सरनाईकांच्या या मागणीमागे ईडीची कारवाई हेच प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होते. शिंदे गटाने वेगळी चूल मांडल्यानंतर शिंदेंसोबत प्रथम जाणाऱ्यांमध्ये सरनाईक एक होते. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर विधानसभेत झालेल्या चर्चेतही त्यांनी माझ्यावरील कारवाईची पहिलेच चिंता का केली नाही, असा सवाल शिवसेना आमदार भास्कर जाधव यांना केला होता. त्यामुळे आता सरनाईक यांना दिलासा मिळतो का हे पहावे लागेल.

यशवंत जाधव - आयकर विभागाकडून 40 मालमत्ता जप्त

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्या आहेत. 40 मालमत्तांमध्ये भायखळ्यातील 26 फ्लॅट्सचा समावेश आहे. यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता आमदार यामिनी जाधव व नातेवाईकांच्या नावावर आहेत. त्यामुळे यामिनी जाधवांसह यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मेहुणे मोहिते यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळातील म्हणजे एप्रिल 2018 पासून ते आतापर्यंतच्या सर्व मंजूर कंत्राटांची माहिती मागितली आहे. त्यामुळे जाधवांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता यशवंत जाधवदेखील शिंदे गटात गेले आहेत. शिवसेनेचे ह्र्दय असणाऱ्या मुंबई पालिका निवडणुकीत त्यांचे योगदान महत्त्वाचे असणार आहे. भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या निवडणुकीत यशवंत जाधव यांचा पुरेपूर वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कारवाईबाबत यशवंत जाधव यांना अभय मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भावना गवळी - ईडीकडून अटकेची टांगती तलवार

खा. भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये 18 कोटींचा घोटाळा झाल्याचा ईडीला संशय आहे. आपल्या स्वीय सहाय्यकाने संस्थेत कोट्यवधींचा अपहार केला आहे, अशी पोलिस तक्रार भावना गवळी यांनीच 2020 मध्ये केली होती. यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गवळी यांना लक्ष्य केले होते. गवळी यांच्याकडे इतके पैसे आले कुठून, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर ईडीने चौकशी सुरू केली. गेल्या सप्टेंबरमध्ये ईडीने गवळी यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते. तसेच, चौकशीला हजर राहण्यासाठी चारदा समन्स बजावले होते. मात्र, भावना गवळी एकदाही चौकशीस हजर राहिल्या नाहीत. यादरम्यान गवळींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचाही प्रयत्न केला. त्या स्वत: मातोश्रीवर गेल्या होत्या. मात्र, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना भेट नाकारली होती. तरीदेखील शिंदे गटाने बंड केल्यानंतर भावना गवळी यांनी आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे सांगितले होते. त्यावर आश्चर्य व्यक्त केले गेले. अखेर शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी शिंदे गटाची वाट धरली, तेव्हा त्यात भावना गवळी एक होत्या. विशेष म्हणजे त्यांची प्रतोदपदीही नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, सतत चौकशीस गैरहजर राहणाऱ्या भावना गवळींवर अटकेचीही टांगती तलवार होती. मात्र, ही तलवार आता दूर होणार की अशीच टांगती राहणार, हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...