आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका जप्त केल्या आहेत. त्याची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहिती स्वत: ईडीने दिली आहे. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे शरद पवार म्हणाले.
श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईनंतर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनलाय. आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतुने कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. खरं सांगायचे म्हणजे गेल्या 5 – 6 वर्षात ही ईडी नावाची संस्था कुणाही माहिती नव्हती, मात्र आता खेड्या-पाड्यात ईडी विषयाच्या चर्चा केल्या जात आहेत. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवाने सुरू आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का. असे शरद पवार म्हणाले.
उद्धव ठाकरेंना रात्री झोप लागणार नाही – सोमय्या
उद्धव ठाकरे माफिया सेनेने जी लुटमार चालवली आहे. त्या लुटमारीचा हिशेब जनतेसमोर ठेवण्याचे काम मी करत आहे. अजून तर ही सुरुवात आहे. पुढचा हिशेब येईल तेव्हा कळेल. किती मनी लॉन्ड्रिंग केले हे श्रीधर पाटणकरांनी घोषित करावे नाहीतर पुढच्या कारवाईला तयार राहावे. ज्या कंपन्यांतून पैसे घेतले ते पैसे पुढे कुठे गेले? असा सवाल करतानाच उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही, असा खोचक टोला सोमय्या यांनी लगावला आहे.
काही तरी पुरावे आले असतील म्हणून कारवाई-नितेश राणे
ठाकरे कुटुंबिय भ्रष्टाचारात गुंतले आहे. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. रश्मी ठाकरे कोण आहेत त्यांच्याच नातेवाईक आहेत ना. ईडीकडे काहीतरी पुरावे असतील म्हणून त्यांनी ही कारवाई केली आहे. ईडीला त्याचे काम करु द्या. असे नितेश राणे म्हणाले आहे.
आम्ही आणखी पक्के होत आहोत- थोरात
सरकार पाडण्याचे जेवढे प्रयत्न केले जात आहेत तेवढे आम्ही पक्के होत आहोत. सर्वजण घडणाऱ्या कृतीवर सामोरे जात आहोत. अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग- नाना पटोले
केंद्रातील भाजप सरकार हताश होऊन तपास यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्राकडून वारंवार प्रयत्न सुरू आहे. मात्र, याचा कोणताही परिणाम महाविकास आघाडीवर होणार नाही. असे नाना पटोले म्हणाले. भाजप सुडाचे राजकारण करत असून, भाजपच्या धमक्यांना महाविकास आघाडी घाबरणार नाही. भाजपला हे खूप महागात पडेल. असा इशारा पटोले यांनी दिला आहे.
काय आहे प्रकरण?
श्रीधर पाटणकर हे श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमीटेडचे मालक आहेत. ईडीने आज त्यांच्या 11 सदनिका जप्त केल्या आहे. पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटींचे विनातारण कर्ज हमसफर डिलर कपंनीने दिले होते. हे 30 कोटी रुपये नंदकिशोर चतुर्वेदींच्या बनावट कंपनीमधून आल्याचा ईडीचा आरोप आहे. नंदकिशोर आणि महेश पटेल यांच्या बनावट कंपन्यांचे पैसे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीत टाकण्यात आले. नंदकिशोर आणि महेश पटेल यांच्या मनी लाँड्रिंगचा ईडीचा आरोप आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.