आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापासत्र:अनिल देशमुखांच्या घरांवर मुंबई-नागपुरात ‘ईडी’चे छापे; मुंबईत सुखदा, ज्ञानेश्वरी निवासस्थानी कारवाई

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वीय सहायक, खासगी सचिवांची केली कसून चौकशी
  • कुटुंबीयांसह कर्मचाऱ्यांचे मोबाइल केले जप्त

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील निवासस्थानी ईडीच्या (सक्त वसुली संचालनालय) पथकाने शुक्रवारी छापेमारी केली. देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे या दोघांचीही कसून चौकशी झाली. दरम्यान, मुंबईत ही कारवाई होत असताना देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानीही छापे टाकण्यात आले. मुंबईत सकाळी आठ वाजता वरळी येथील सुखदा इमारतीमध्ये असलेल्या देशमुख यांच्या निवासस्थानी सीआरपीएफ पथकासह ईडीचे अधिकारी पोहोचले.

या पथकात फॉरेन्सिक टीमही होती. त्या वेळी देशमुख यांचे सरकारी निवासस्थान ज्ञानेश्वरी येथेही झाडाझडती सुरू होती. ९ तास ईडी अधिकाऱ्यांनी दोन्ही निवासस्थांची झडती घेतली. नागपूरमध्ये यापूर्वी ईडीच्या पथकांनी १६ जून रोजी दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्यावर धाडी टाकून काही कागदपत्रे जप्त केली होती.

ईडी आमच्यासाठी नवीन नाही : शरद पवार
ईडी वगैरे यंत्रणा आमच्यासाठी नवीन नाहीत. याआधीही अनेकांबाबत केंद्रीय यंत्रणांकडून गैरवापर झाला आहे. अशा छाप्यांतून आणि चौकशीतून या यंत्रणांच्या हाती काही लागणार नाही. याची यत्किंचितही चिंता वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी शुक्रवारी पुण्यात व्यक्त केली. प्रत्यक्षात छापे टाकणाऱ्यांच्या हाती काही एक लागले नाही. त्यामुळे यातून काही निष्पन्न होणार नाही, असा दावा पवार यांनी केला.

चौकशीत सहकार्य करतोय, सत्य बाहेर येईलच : आमदार अनिल देशमुख

  • आ. अनिल देशमुख : ईडीच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करत आहे. भविष्यातही सहकार्य करेन. या चौकशीतून सत्य बाहेर येईलच.
  • खा. सुप्रिया सुळे : राजकीय सुडापोटी ही कारवाई आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा इतका गैरवापर यापूर्वी कधीही झाला नव्हता.
  • जयंत पाटील : वाझेने दबावाला बळी पडून कबुली दिली. त्याआधारे छापेमारी करणे चुकीचे आहे.
  • संजय राऊत : ईडीचा वापर करून भाजपला राज्यात सत्ता मिळवता येणार नाही. ईडी, सीबीआयने रामजन्मभूमी जमीन खरेदीचा तपास करायला हवा.
  • दिलीप वळसे पाटील (गृहमंत्री): तपास यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करत असतात. हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यावर बोलणे उचित नाही.
  • देवेंद्र फडणवीस : केंद्रीय तपास यंत्रणा उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करत आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे. संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन बोलत अाहेत.

मोबाइल, कागदपत्रे जप्त
ईडी अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या कुटुंबीयांचे आणि निकटवर्तीयांचे मोबाइल आणि डिजिटल डाटा ताब्यात घेतला. या वेळी देशमुख ‘ज्ञानेश्वरी’ निवासस्थानी होते. देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कर्मचारी सुखदा इमारतीमधील घरी होते. या सर्वांची चौकशी झाली. काही कागदपत्रे जप्त करण्यात आली.

४ कोटी हप्त्याचा तपास
ईडीने या प्रकरणात मुंबईतील काही बारमालकांचे जबाब यापूर्वी नोंदवले होते. त्यात १० बारमालकांनी देशमुख यांना काही महिने मासिक ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली होती. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यासाठी मुंबई व नागपुरात छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

प्रकरण काय?
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. देशमुख यांनी दरमहिन्याला १०० कोटी रुपये हप्ता जमा करायला सांगितले होते, असा गंभीर आरोप त्यात होता. परिणामी देशमुखांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने एप्रिलमध्ये दिल्लीत गुन्हा दाखल केला होता. याच आधारे ईडीने मे महिन्यात पैशाच्या अफारातफर प्रकरणी गुन्हा दाखल केला. शेल कंपन्या किंवा हवालामार्फत पैसा गुंतवला आहे का, याचा तपास ईडी करत आहे.

बातम्या आणखी आहेत...