आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र-राज्य संघर्ष विकोपाला:राऊतांच्या मालमत्तेवर ईडीची टाच, दिल्लीचे मंत्री, पश्चिम बंगालमध्येही कारवाई, 11 कोटींची स्थावर मालमत्ता; अलिबागचे 8 प्लॉट, दादरचा फ्लॅट सील

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांवरील खंडणीच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापन केल्याची घोषणा आघाडी सरकारने मंगळवारी सकाळी केली. त्यापाठोपाठ दुपारी ईडीने शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांच्याशी संबधित ११ कोटी १५ लाखांच्या मालमत्तांवर टाच आणली.

सुमारे १०३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावे असलेले अलिबागमधील ८ भूखंड आणि राऊत यांच्या नावे दादरमध्ये असलेल्या एका फ्लॅटवर ईडीने सील ठोकले आहे. १५ दिवसांमध्ये ईडीने मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि आता खासदार संजय राऊत अशा शिवसेनेच्या ३ लोकांची संपत्ती जप्त केल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ माजली आहे. ईडीच्या टार्गेटवर सध्या शिवसेना नेते असल्याचे चित्र आहे. आता ईडीच्या हिट लिस्टवर कोण, अशी चर्चा सुरू झाली आहे.

काय आहे प्रकरण?
१. गोरेगावमधील पत्राचाळीच्या पुनर्विकासासाठी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनने म्हाडासोबत करार केला होता. ६७२ फ्लॅट पत्राचाळीतील रहिवाशांना दिले जाणार होते. गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीने कोणतेही बांधकाम व जमीन १ हजार ३४ कोटी रुपयांना दुसऱ्या बिल्डरला विकली होती.

२. प्रवीण राऊत यांच्यासह पीएमसी बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी एचडीआयएलचे सारंग आणि राकेश वाधवान फर्मचे संचालक होते. ईडीने या प्रकरणी ईसीआयआर नोंदवला आणि राऊत यांना २ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली.

३. प्रवीण राऊत हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे जवळचे नातेवाईक आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना ५५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिल्याचे समोर आले होते. त्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट खरेदीसाठी केला.

४. मनी लाँड्रिंग अॅक्ट (आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा) २००२ कायद्यानुसार कारवाई झाली आहे. सुडाच्या कारवायांपुढे गुडघे टेकणार नाही : अशा कारवायांमुळे राऊत किंवा शिवसेना खचणार नाही. सुडाच्या कारवायांपुढे आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही असे संजय राऊत म्हणाले.

दिल्ली, पश्चिम बंगालमध्येही ईडीची कारवाई
नवी दिल्ली- महाराष्ट्रासह दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्येही राजकीय नेते व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधितांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीने दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांचे कुटुंब आणि कंपन्यांच्या ४.८१ कोटी रुपयांच्या संपत्तीवर टाच आणली. तथापि, ईडीने पश्चिम बंगालमध्ये २०१३ मधील सारदा चिटफंड मनी लाँड्रिंग प्रकरणात ३५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

वर्षा राऊत यांचे जप्त अकृषी भूखंड : किहिम (ता. अलिबाग)
४७५२ (चौ.फू.) किंमत ४ लाख २८ हजार, खरेदी वर्ष २०१०. १९३२ (चौ.फू.) किंमत २१ लाख ४१ हजार, खरेदी वर्ष २०१०. ३३७५ (चौ.फू.) किंमत २१ लाख ४५ हजार, खरेदी वर्ष २०१०. १८६२ (चौ.फू.) किंमत २ लाख १४ हजार, खरेदी वर्ष २०१०. १८५७ (चौ.फू.) किंमत ४ लाख २४ हजार, खरेदी वर्ष २०१०. १९९७ (चौ.फू.) किंमत ३ लाख २४ हजार, खरेदी वर्ष २०१२. २४२२ (चौ.फू.) किंमत ५ लाख ३५ हजार, खरेदी वर्ष २०१२. १६४१ (चौ.फू.) किंमत ३ लाख १८ हजार, खरेदी वर्ष २०१२. या सर्व भूखंडांची किंमत राऊत यांनी आपल्या २०१९ च्या निवडणूक पत्रात ५० लाख इतकी दाखवली आहे.
दिव्य मराठी एक्स्पर्ट व्ह्यू- सतीश तळेकर, ज्येष्ठ वकील, उच्च न्यायालय, मुंबई.

संजय राऊत यांची जप्त सदनिका
मुंबईतील दादर पूर्व येथे गार्डन कोर्ट इमारतीत २५ व्या मजल्यावर ८८० चौ. फुटांची सदनिका संजय राऊत यांच्या नावे असून त्याची २०११ मध्ये खरेदी किंमत ९८ लाख इतकी दाखवली.

मालमत्तेचा वापर करता येताे, व्यवहारावर बंदी
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मालमत्ता जप्त केल्यानंतर संबंधित मालकास त्याचा वापर करता येतो. ती संपत्तीही मूळ मालकाकडेच राहते. मात्र ती मालमत्ता गहाण ठेवता येत नाही, तसेच त्याच्यावर कर्ज काढता येत नाही, ती भाड्याने देता येत नाही किंवा ती विकताही येत नाही. टाच आणलेल्या संपत्तीबाबतच्या ईडीच्या निर्णयास न्यायालयात आव्हान देता येते किंवा हा खटला पूर्ण झाल्यानंतर संबंधित निर्दोष असल्यास ती मालमत्ता त्याला परत मिळते. परंतु यामध्ये मोठा कालावधी जातो.

बातम्या आणखी आहेत...