आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्राचाळप्रकरणी ईडीचे समन्स:संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना उद्या चौकशीसाठी बोलावले, आर्थिक व्यवहारांची तपासणी होणार

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे एक हजार कोटींच्या या घोटाळाप्रकरणी राऊत कुटुंबीयांसमोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.

वर्षा राऊत यांच्यावरील आरोप

पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत यांचे भाऊ प्रविण राऊत यांनी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावर 55 लाख रुपये टाकले होते. हे पैसे कोठून आले व ते वर्षा राऊत यांना का देण्यात आले, याचा तपास ईडी करत आहे. याप्रकरणी ईडीने राऊत यांच्यावर मनी लॉड्रिंगचा गुन्हादेखील केला आहे. आता याच आरोपांची चौकशी करण्यासाठी वर्षा राऊत यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स ईडीतर्फे बजावण्यात आले आहे. ईडीतर्फे वर्षा राऊत यांच्या सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे.

राऊतांच्या कोठडीत वाढ

दरम्यान, संजय राऊत यांना एक हजार कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने आज दुसऱ्यांदा पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना 8 ऑगस्टपर्यंत कोर्टाने ईडीची कोठडी ​​​​​सुनावली आहे. आज सुनावणीदरम्यान ईडीतर्फे सांगण्यात आले की, वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात कोट्यवधींचे व्यवहार झाले आहेत. ईडीच्या तपासात अजून काही व्यवहार समोर आले आहेत. त्यामुळे संजय राऊत यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी ईडीने केली. न्यायालयाने ती मागणी मान्य केली. दरम्यान, उद्या वर्षा राऊत यांच्या चौकशीतून काय समोर येते आणि त्यांच्यावरही ईडी कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.