आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडी vs आघाडी:आता भाजपचे गिरीश महाजन, प्रवीण दरेकर, लाड ‘टार्गेट’वर, छाप्यांच्या भाषेत विरोधकांना प्रत्युत्तर देण्यावर शरद पवार-उद्धव ठाकरे यांच्यात प्रदीर्घ चर्चा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपचे बडे नेते महाआघाडी सरकारच्या रडारवर

ईडी, सीबीआय, आयकर विभाग व एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा महाविकास आघाडीचे नेते, मंत्र्यांच्या मागे हात धुऊन लागल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. भाजपला छाप्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचे समजते. परिणामी राज्य सरकारच्या तपास यंत्रणा भाजप नेत्यांची प्रकरणे आगामी काळात काढण्याची शक्यता आहे.

पवार-ठाकरे यांच्यात या आठवड्यातील ही दुसरी बैठक आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेली बैठक ३० मिनिटे चालली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (२७ जिल्हा परिषदा+ १० महानगरपालिका) निवडणुका फेब्रुवारी, मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारला बॅकफूटवर राहणे परवडणारे नाही. त्यामुळे भाजपला छाप्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले पाहिजे, अशी चर्चा दोघां नेत्यांमध्ये झाल्याचे समजते.

भावना गवळींनी ईडीकडे मागितली १५ दिवसांची मुदत
वाशीम | शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना चिकुनगुन्याची लागण झाल्याने त्या बुधवारी ईडीच्या कार्यालयात हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनी ईडीकडे १५ दिवसांची मुदत मागितल्याची माहिती त्यांचे वकील इंद्रपालसिंग यांनी दिली. दरम्यान, त्या सध्या दिल्लीत असल्याची चर्चाही ऐकावयास मिळत आहे. वाशीम येथे श्री बालाजी पार्टिकल बोर्ड नावाने खा. गवळी यांचा कारखाना आहे. याला राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी, तर राज्य शासनाने १४ कोटी अनुदान दिले. मात्र, ४३ कोटी रुपयांचे अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही. उलट ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला. याच घोटाळाप्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

भाजपचे बडे नेते महाआघाडी सरकारच्या रडारवर
बँक, कंपन्या अन् बीएचआर घोटाळे बाहेर काढणार?

भाजप नेत्यांच्या घोटाळ्यांवर आपण बोलले पाहिजे. एकत्रित ठोस भूमिका घेऊन आक्रमक झाले पाहिजे, अशी चर्चा दोन्ही नेत्यांत झाल्याचे समजते. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेली मुंबई जिल्हा बँक, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपन्या व जामनेरचे भाजप आमदार गिरीश महाजन यांच्या जळगावच्या बीएचआर सहकारी बँकेतील कथित घोटाळा आदी प्रकरणे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गृह विभाग अजूनही थंड कसा म्हणून नाराजी
१ केंद्रीय तपास यंत्रणा आघाडीच्या नेत्यांवर तुटून पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्या अखत्यारीमध्ये असलेला गृह विभाग मात्र थंडच आहे. त्याबाबत आघाडीच्या नेत्यांत मोठी नाराजी आहे.

२ बाॅलीवूडच्या मागे एनसीबी (अमली पदार्थ नियंत्रण विभाग) लावून बदनाम केले जात आहे. याविरोधात उभे राहिले पाहिजे. आघाडीने विरोधाची ठाम भूमिका घेतली पाहिजे. यावर पवार-ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते.

ईडी आघाडी
त्रस्त नेत्यांच्या पाठीशी उभे राहणार : केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांना अाघाडीचे नेते, मंत्री व्यक्तिगत तोेंड देत आहेत. त्याबाबतही आघाडीत मोठी नाराजी आहे. राज्य सरकार, पक्ष आणि आघाडी म्हणून नेत्यांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, अशी चर्चा पवार-ठाकरे यांच्या आजच्या बैठकीत झाल्याचे सूत्रांकडून समजते. एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील संघर्ष तीव्र होणार आहे, अशी चिन्हे दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...