आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग -
ईडीच्या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे. भाजपाचा हा नवा धंदा आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे.
केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपाला असून अशा कारवायांविरोधात आता चर्चा करून आम्ही सामुहिकरित्या लढा देणार आहेत. महाराष्ट्राची बदनामी करुन सत्ता मिळवण्यासाठी हे सर्व चालले असून जनता हे पहात आहे.
चौकशीनंतर नवाब मलिक यांना ‘ईडी’कडून अटक
दरम्यान, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. ईडीच्या पथकाने मलिकांना चौकशीसाठी पहाटे 6 वाजताच ईडी कार्यालयात नेले होते. अंडरवर्ल्डशी संबधित जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी मलिकांची चौकशी झाली होती. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.