आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतून वेगळा पडलेला एकनाथ शिंदे यांचा गट सर्व आमदारांसह आज गुवाहाटीतून महाराष्ट्रात न येता शेजारचे राज्य गोव्यात जाणार आहे. गोवा येथील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये आमदारांसाठी 71 खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात राज्यपालांनी उद्या म्हणजेच 30 जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आमदार गुवाहाटीतून मुंबईत न येता गोव्याला का जात आहेत, यावरून उलटसुलट चर्चाही सुरू झाल्या आहेत. उद्याच्या बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेची याचिका दाखल आहे. यावर आज सुनावणी झाल्यानंतर शिंदे गट गुवाहाटी सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गुवाहाटीहून बंडखोर गोव्यात का जाणार?
राज्यातील पावसाचं वातावरण असल्यामुळे विमानाच्या दळणवळणावर ऐनवेळी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 30 जून रोजी सकाळी 11 वाजताच फ्लोअर टेस्टसाठी अधिवेशन बोलावलेलं आहे. यामुळे ऐनवेळी अडचण नको म्हणून शिंदे गटाने गोवा राज्यात आज उतरण्याचं ठरवलेलं आहे. गोव्यातील ताज कन्व्हेशन हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी 71 खोल्या बुक करण्यात आल्या असून येथूनच हे आमदार बहुमत चाचणीसाठी मुंबईत दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे बुधवारी सकाळी गुवाहाटीमध्ये माध्यमांना म्हणाले की, आम्ही 40+10 आमदार आहोत. आम्ही उद्या बहुमत चाचणीसाठी मुंबईला जाणार आहोत. 2/3 पेक्षा जास्त बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे बहुमत चाचणीत काय, होईल हे सर्वश्रुत आहे.
बहुमत चाचणीविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात
दरम्यान, शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावलेल्या अधिवेशनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज संध्याकाळी 5 वाजता सुनावणी होणार आहे. यामुळे यानंतरच बहुमत चाचणी होईल की नाही, हे स्पष्ट होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.