आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:भाजप बैठकीला एकनाथ खडसेंची पाठ, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निश्चित, बैठकीत व्हर्च्युअली सहभागी झाल्याचा भाजपचा दावा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रवादीच्या बैठकीत खडसेंवर चर्चा

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुरुवारी भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीकडे पाठ फिरवली, तर त्याच वेळी कुलाबा येथे चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत खडसे यांना पक्षात प्रवेश देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

खडसे दोन दिवस मुंबईत तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी खडसे हे चर्चा करण्यासाठी मुंबईत आवर्जून आल्याचे राष्ट्रवादीचे नेते सांगत होते. दादरच्या वसंत स्मृती येथे भाजप कार्यसमितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला हजर राहणार असल्याचा दावा भाजपने केला होता. मात्र या बैठकीला खडसे फिरकले नाहीत. यासंदर्भात भाजप प्रवक्ते महेश पाठक यांना विचारले असता प्रदेश कार्यसमितीची बैठक दुपारच्या सत्रात होती, त्या बैठकीचे सर्व सदस्य व्हर्च्युअली हजर राहणार होते. त्यामुळे खडसे प्रत्यक्ष बैठकीला येण्याचा प्रश्नच नव्हता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. खडसे व्हर्च्युअली गुरुवारी भाजपच्या बैठकीला उपस्थित राहणार होते, तर मग जळगावहूनसुद्धा बैठकीत सहभागी होऊ शकले असते, त्यांना मुंबईत येण्याची काय गरज होती, असा सवाल राष्ट्रवादीच्या मुंबईतील एका पदाधिकाऱ्याने केला. तसेच खडसे यांचा राष्ट्रवादीतला प्रवेश निश्चित असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.

राष्ट्रवादीच्या बैठकीत खडसेंवर चर्चा : तिकडे कुलाब्यात शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. खडसे पक्षात आल्यास जळगाव जिल्हा परिषद, जिल्हा बँक, दूध संघ राष्ट्रवादीच्या ताब्यात येईल. जळगावमध्ये राष्ट्रवादीचे विशेष संघटन नाही. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने मराठा आणि लेवा पाटील असे जिल्ह्यात समीकरण जुळून राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्ह्यातील विधानसभेच्या जागा वाढतील, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे समजते.

बातम्या आणखी आहेत...