आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश:नाथाभाऊंसाठी खान्देशातील कार्यकर्त्यांची गर्दी तर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
जळगावहून आलेले कार्यकर्ते हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत होते.
  • अजित पवारांच्या गैरहजरीने सोहळा सुनासुना, जळगाव येथून सुमारे 200 मोठ्या गाड्या आल्या

भाजपचे बुजुर्ग नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी प्रवेश झाला. खरा पण हेरडिया मार्गावरील प्रदेश कार्यालयात प्रवेश सोहळा होता, तेथे पाठिंबा देण्यासाठी आलेले बहुतांश कार्यकर्ते नाथाभाऊंच्या जळगाव जिल्ह्यातून आले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या प्रवेश शोहळ्याला पाठ फिरवल्याचे दिसून आले.

एकनाथ खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील बडे प्रस्थ आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाला राष्ट्रवादीतून मोठा पाठिंबा मिळेल, असा अंदाज होता. मात्र, आज झालेला पक्ष सोहळा तसा थंडा थंडा, कूल कूल असाच पार पडला. पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यासाठी धुळे, नंदुरबार, जळगाव येथून सुमारे २०० मोठ्या गाड्या आल्या होत्या. हे नाथाभाऊंचे पाठीराखे येताना फ्लेक्स, बॅनर आणि फलक घेऊन आले होते. ते राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यालय ज्या परिसरात आहे, तिकडे घोषणा देत जथ्थ्याने येत होते. साहेबांना मिळाले नाथभाऊंचे बळ, राष्ट्रवादी होणार आता अधिक प्रबळ तसेच बळकट होतील राष्ट्रवादीची पाळेमुळे नाथाभाऊ अन रोहिणीताईंच्या पक्ष प्रवेशाला मुळे, अशा घोषणा जळगावहून आलेल्या कार्यकर्त्यांच्या फलकावर होत्या.

जळगावहून आले केवळ ७२ समर्थक व कार्यकर्ते

जळगावहून आलेल्या नाथाभाऊंच्या निवडक ७२ कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी यांना सोहळ्याच्या ठिकाणी प्रवेश होता. माध्यम प्रतिनिधींसह कार्यकर्ते प्रदेश कार्यालयाबाहेर होते. बाहेर दोन मोठे डिजिटल फलक होते. त्यावर प्रवेश सोहळ्याचे प्रक्षेपण दाखविण्यात येत होते. नाथाभाऊंच्या भाषणाला सर्वाधिक जल्लोष झाला. नाथाभाऊंनी जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देण्याची भाषा केली, तेव्हा तेव्हा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केल्याचे दिसले.

सीएसटीपासून प्रदेश कार्यालयापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राष्ट्रवादीचे झेंडे लागले होते. राष्ट्रवादी कार्यालयाबाहेर नाथाभाऊ, शरद पवार आणि जयंत पाटील यांची छायाचित्रे असलेले कटआउट अगदी दुपारी लावण्यात आले. दरम्यान, खडसे यांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. अपेक्षेप्रमाणे ज्यावेळी खडसे भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा कार्यकर्त्यांनी एकच जयघोष केल्याचे पाहायला मिळाले.

अन‌् कार्यकर्त्यांचे चेहरे आले ताणावाखाली

अजित पवार समर्थकांची उपस्थिती नव्हती. अजित पवारांच्या अनुपस्थितीमुळे हा प्रवेश सोहळा सुनासुना भासत होता. सोहळ्यात जान आणण्यासाठी हलगी, ढोल वाजत होते, पण ते नावालाच होते. कार्यक्रमास विलंब होऊ लागल्याने कार्यकर्त्यांचे चेहरे तणावाखाली होते.